व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
जयदीप मेढे June 11, 2026 10:43 PM

Rahul Gandhi: भाजपने मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या तिन्ही जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचे उमेदवार रजनीश अग्रवाल, तरुण चुघ आणि महेश केवट यांना निवडणूक प्रमाणपत्रे जारी केली. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली. निवडणूक आयोगाने अद्याप या प्रकरणी कोणताही निर्णय दिलेला नाही.

भाजप आणि निवडणूक आयोगाने ही जागा चोरली

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका सभेत, या घडामोडीसंदर्भात भाजप आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यात आले. राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि निवडणूक आयोगाने ही जागा चोरली आहे. एका किरकोळ आक्षेपाच्या आधारावर काँग्रेसच्या उमेदवाराचे नामांकन फेटाळण्यात आले, तर भाजप-समर्थित उमेदवाराला चुका सुधारण्याची संधी देण्यात आली. निवडणूक आयोगाने दोन्ही उमेदवारांना वेगळी वागणूक दिली आणि काँग्रेसच्या आक्षेपांना प्रतिसादही दिला नाही. काँग्रेसने मध्य प्रदेशातील तिसऱ्या जागेसाठी मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ होते, परंतु 9 जून रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने निवडणूक सुरू होण्यापूर्वीच सीट चोरी करून स्पर्धाच संपवून टाकली आहे.

सर्वकाही सुधारण्यासाठी वाढीव वेळ दिला

ते पुढे म्हणतात, अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये काय घडले ते पहा, काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी सर्व कागदपत्रे सादर केली होती. त्यांच्यावर एकही खटला प्रलंबित नव्हता. तरीही, निवडणूक आयोगाने भाजपच्या एका फालतू हरकतीवरून त्यांचे नामांकन रद्द केले. याउलट, भाजपचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांनी फॉर्मवर स्वतःचे नावच चुकीचे लिहिले होते आणि अनेक अनिवार्य माहिती लपवली होती. तरीही आयोगाने त्यांना सर्वकाही सुधारण्यासाठी वाढीव वेळ दिला.

तेव्हा त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही 

त्यांनी शेवटी म्हटलं आहे की, एकच निवडणूक आयोग, दोन उमेदवार. एकाला सुनावणीची संधी न देताच अपात्र ठरवले गेले, तर दुसऱ्याने नियम मोडलेले असूनही त्याला मदत केली गेली. जेव्हा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे बैठकीची मागणी केली, तेव्हा आधी त्यांनी आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही अखेर त्यांना भेटलो, तेव्हा त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. भविष्यात अशा गोष्टी आणखी पाहायला मिळतील. कारण भाजपसाठी निवडणूक जिंकण्यापेक्षा ती मॅनेज करणे खूप सोपं आहे.

काँग्रेसची निकालांना स्थगिती देण्याची मागणी

यापूर्वी, काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजता असल्याने या प्रकरणाची सुनावणी आजच व्हावी. निवडणूक आयोगाने सांगितले की, त्यांना अद्याप याचिकेची प्रत मिळालेली नाही आणि प्रतिसाद देण्यासाठी वेळ हवा आहे. सिंघवी यांनी उत्तर दिले की, दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली तरी तोपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर करू नयेत. न्यायालयाने सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये कायदा आधीच स्पष्ट आहे आणि याचिका पुढील सुनावणीसाठी सूचीबद्ध केली. सुनावणी पुढे ढकलल्यानंतर, काँग्रेसने पुन्हा मागणी केली की न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर करू नयेत.

काँग्रेसने ही याचिका आज (11 जून) मध्यरात्री 1:48 च्या दरम्यान ऑनलाइन दाखल केली. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, निवडणूक अधिकाऱ्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय बेकायदेशीर, मनमानी आणि पक्षपाती होता. काँग्रेसने न्यायालयाला हा निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.