मी कायम 12 वा खेळाडू राहणार… संधी कधी मिळणार? धनंजय मुंडेंची खदखद आली समोर
Tv9 Marathi June 11, 2026 11:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. मुंबईतील या कार्यक्रमाला राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी कायम 12 वा खेळाडू राहणार याची मला जाणीव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

मी कायम बारावा खेळाडू…

धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर नेण्यासाठी सर्वांनी संघर्ष आणि संकल्प करण्याची गरज आहे. स्टेजवर सर्व खेळाडू आहेत, समोर बसलेले देखील खेळाडू आहेत. ते पाहत आहेत आम्हाला कधी संधी मिळणार, मात्र मी कायम 12 वा खेळाडू राहणार याची जाणीव आहे. खेळ असो किंवा राजकारण असो एक मात्र निश्चित आहे, ज्या सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप जिंकून दिला त्यालासुद्धा संघात स्थान मिळालं नाही आणि वयाच्या 15 वर्षीसुद्धा वैभव सूर्यवंशीला संधी मिळते.’

कर्तृत्वाला संधी मिळाली पाहिजे

पुढे बोलताना मुंडे यांनी म्हटले की, वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात जागा मिळाली. याचा अर्थ कर्तृत्वाला, कार्यकर्त्याच्या निष्ठेला, त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणं गरजेचं आहे. तरच अजितदादांचे स्वप्न आपण पूर्ण करु. दादांचं काम वैभव सुर्यवंशीसारखं कमी चेंडूत जास्त धावा काढण्यासारखं आहे. सोन्याच्या अंगठीत हिरा टाकावा तसे कार्यकर्ते दादांनी घडवले आहेत. आपल्याला नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे, त्यासाठी सर्वजण कष्ट घेऊयात.

पक्षापेक्षा कुणी मोठं नाही – भुजबळ

छगन भुजबळ यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. मगापासून चाललं हा खो खो खेळतो, कबड्डी खेळतो, बुद्धीबळ खेळतो. अरे बाबा खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, फक्त ऑफिस किंवा त्यावर लावलेला बोर्ड नाही. पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या. त्याच निष्ठा सुनेत्रा ताईंच्या चरणी वाहायच्या आहेत.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.