प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त कंटेंटवर मोठी कारवाई! डॉ. सेजल पवारसह तिघांवर गुन्हा दाखल, समन्सही बजावलं
सूरज सावंत June 11, 2026 10:43 PM

Pranit More Stand Up Comedy FIR Updates : सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिलांविषयी, संमती (Consent) आणि मृत व्यक्तींच्या मृतदेहाविषयी कथित आक्षेपार्ह, अश्लील आणि अवमानकारक वक्तव्यं प्रसारित केल्याप्रकरणी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) याच्यासह इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र सायबर'ने (Maharashtra Cyber) या प्रकरणात अत्यंत कडक पावलं उचलत गुन्हा नोंदवला आहे.

महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात या वादग्रस्त शोप्रकरणी एफआयआर (FIR क्रमांक 36/2026) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जंगरा (Himanshu Jangra) आणि डॉ. सेजल पवार (Dr. Sejal Pawar) यांच्यासह शो संबंधित इतर व्यवस्थापकांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Stand Up Comedy BNS IT Act : 'या' गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंद

तपासादरम्यान यूट्यूब (YouTube), इन्स्टाग्राम (Instagram) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या काही व्हिडीओ क्लिप्समध्ये गंभीर आक्षेपार्ह मजकूर आढळल्याचा दावा महाराष्ट्र सायबरने केला आहे. त्यानुसार खालील कलमे लावण्यात आली आहेत:

भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे : कलम 75(1)(iv), 75(3) (महिलांचा विनयभंग/अपमान), 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा शब्द) आणि 353(2).

माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) : आयटी ॲक्ट 2000 मधील कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील मजकूर प्रसारित करणे).

Allegation On Pranit More : नेमका आरोप काय आहे?

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये महिलांविषयी अत्यंत अवमानकारक आणि शारीरिक संमतीच्या (Consent) अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचे क्षुल्लकीकरण करणारी विधाने करण्यात आली होती. तसेच एका अन्य व्हिडीओ क्लिपमध्ये मृत पुरुषांचे मृतदेह आणि वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) वापरल्या जाणाऱ्या मानवी मृतदेहाबाबत (Cadavers) कथित अत्यंत अश्लील, किळसवाणी टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप आहे. हे वक्तव्य मृतांच्या सन्मानाला धक्का देणारे आणि सार्वजनिक सभ्यतेच्या मानकांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे.

Pranit More Stand Up Comedy Row : एंगेजमेंट आणि पैशांसाठी अश्लील कंटेंट?

महाराष्ट्र सायबरच्या मते, संबंधित कार्यक्रमाशी निगडित हा वादग्रस्त कंटेंट मुद्दाम रेकॉर्ड करून विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला. केवळ सोशल मीडियावरील प्रेक्षकसंख्या वाढवणे, ऑनलाइन एंगेजमेंट मिळवणे आणि त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळवणे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

या प्रकरणात प्रणित मोरे, हिमांशू जंगरा आणि डॉ. सेजल पवार यांना पुढील चौकशीसाठी आणि त्यांचा अधिकृत जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी समन्स (Summons) बजावले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्वांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र सायबरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सायबरने सर्व डिजिटल कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना ऑनलाइन सामग्री तयार व प्रसारित करताना कायद्याचं पालन करण्याचं आणि जबाबदारीनं वागण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सामान्य नागरिकांनी अशा प्रकारचा कथित आक्षेपार्ह किंवा अश्लील मजकूर सोशल मीडियावर पुढे शेअर अथवा फॉरवर्ड करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.