Womens T20i World Cup 2026 : 1 ट्रॉफी, 2 ग्रुप, 12 संघ-33 सामने, 12 जूनपासून वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार, जाणून घ्या सर्वकाही
Tv9 Marathi June 12, 2026 03:45 AM

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी अखेर संपणार आहे. बहुप्रतिक्षित आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. एकूण 24 दिवस 7 मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी 12 संघ भिडणार आहेत. या 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघांत 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. एका टीमला आपल्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध 1 मॅच खेळायची आहे. दोन्ही गटातून सर्वाधिक सामने जिंकणारे 2-2 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर सेमी फायनलमधून अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित होतील. तर अंतिम सामन्याच्या निकालानंतर वर्ल्ड कप विनर निश्चित होईल.

2 गट आणि 12 संघ, टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?

आयसीसीने यंदाही भारत आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवलं आहे. भारत आणि पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि बांगलादेशचाही ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बी ग्रुप : इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्टइंडीज, श्रीलंका, स्कॉटलंड आणि आयर्लंड.

ए ग्रुप: टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका आणि नेदरलँड्स.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं हे 10 वं पर्व आहे. या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होणार आहेत. याआधी 10 संघ वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले होते. त्यामुळे यंदा क्रिकेट चाहत्यांना अधिक सामने पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नेदलँड्स वुमन्स टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण

दरम्यान 10 व्या पर्वातून नेदरलँड्सचं आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण होणार आहे. नेदरलँड्सने ग्लोबल क्वालिफायरमधून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. नेदरलँड्स ग्लोबल क्वालिफायर स्पर्धेत चौथं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे नेदरलँड्स पदार्पण कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.