Ganja Seized : कामेरीमध्ये ९ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक
esakal June 12, 2026 03:45 AM

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - वाळवा तालुक्यातील कामेरी गावात ईश्वरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ लाख ८९ हजार रुपये किमतीची ४८ गांजाची झाडे सापडली आहेत. याप्रकरणी येलूर (ता. वाळवा) येथील रविंद्र सदाशिव माळी (वय-४९) आणि आनंदा भिमराव चव्हाण, (वय-५०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुन्हे प्रकटीकरण पथक कामेरी गावात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे.

पोलिसांनी सापळा रचून राजमुद्रा मटका मिसळजवळ झाडाखाली प्लास्टिकचे पोते घेऊन बसलेल्या रविंद्र माळी याला ताब्यात घेतले. त्याच्या पोत्यात गांजाची झाडे आढळून आली. चौकशीत त्याने ही झाडे आनंदा चव्हाण याच्या वाट्याने केलेल्या ऊस शेतातून आणल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी आनंदा चव्हाण याच्या शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे ८ ते ९ फूट उंचीची, उग्र वासाची एकूण ४८ गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. पंचासमक्ष ही सर्व झाडे उपटून जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन ४४ किलो ४५० ग्रॅम असून, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ८ लाख ८९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस विशाल पांगे यांनी फिर्याद दिली असून अंमली औषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण दिडवाघ करत आहेत.

कुबेर खोत, अमोल सावंत, दिपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, अरुण कानडे, विकास थोरबोले, रविंद्र बनसोडे विजय पाटणकर, अभिजीत पाटील, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने यांनी कारवाईत भाग घेतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.