Gas Cylinder KYC : केवायसीअभावी सिलिंडरला नकार; ग्राहकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे वितरकांचे आवाहन
esakal June 12, 2026 03:45 AM

पुणे - घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी सुरू केलेल्या ई-केवायसी मोहिमेमुळे गॅस वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. केवायसी पूर्ण न झालेल्या ग्राहकांना काही गॅस वितरकांकडून सिलिंडर देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

काही ठिकाणी घरपोच आलेले सिलिंडरही केवायसी नसल्याचे कारण देत परत नेण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांना केवायसी पूर्ण करण्यासाठी जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मात्र, अनेक ग्राहकांना मुदतीबाबत पुरेशी माहिती नसल्याने आणि केवायसीची माहिती न मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीतील रहिवासी आणि डिजिटल सुविधांपासून दूर असलेल्या कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर वितरणासाठी वाहन आले होते. मात्र, केवायसी झालेली नसल्याचे सांगून सिलिंडर परत नेण्यात आला. दुसरा सिलिंडरदेखील संपलेला होता. त्यामुळे आमची मोठी गैरसोय झाली.

- पूजा काकडे, गृहिणी

ग्राहकांना वेळोवेळी संदेश पाठविले जात आहेत. बहुतांश ठिकाणी वितरण सुरळीत सुरू आहे. मात्र, ग्राहकांनी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवायसीअभावी आम्ही सिलिंडर अडवले नाही.

- एक सिलिंडर वितरक

अशी आहे नोंदणी प्रक्रिया

  • जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन नोंदणी करता येते

  • अधिकृत ॲपचा वापर करूनदेखील नोंदणी केली जाते

  • आधार क्रमांक व ग्राहक तपशील द्यावा लागतो

  • बायोमेट्रिक किंवा ओटीपीद्वारे होते पडताळणी

  • पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश प्राप्त होतो

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड, वैध ओळखपत्र

  • ग्राहक क्रमांक/गॅस बुक

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

केवायसी म्हणजे काय?

एलपीजी ग्राहकांची ओळख आणि नोंदणीची माहिती अद्ययावत करण्यासाठी ई-केवायसी केली जात आहे. यामुळे ग्राहकाची ओळख, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि आधार तपशील पडताळले जातात. बनावट जोडण्या रोखणे आणि अनुदान योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हा यामागील उद्देश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.