El Nino 2026 : चिंता वाढली! प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; पावसावर आणि शेतीवर होणार मोठा परिणाम
esakal June 12, 2026 11:45 AM

मुयरेश प्रभुणे

पुणे, ता. ११ : विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या वर पोहचले असून, तिथे न्यूट्रल स्थिती जाऊन ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था ‘नोआ’च्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (सीपीसी) गुरुवारी केली. डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून, यंदाचा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता ६३ टक्के असल्याचे ‘सीपीसी’ने म्हटले आहे. ‘सीपीसी’ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, मध्य ते पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे वाढलेले तापमान लक्षात घेता, गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

चालू आठवड्यात निनो ३.४ या मध्य क्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदले गेले आहे. महासागराच्या पश्चिमेकडील भागाचे तापमान ०.७ अंश; तर पूर्वेकडील तापमान २.१ अंशांनी जास्त नोंदले गेले आहे. मध्य प्रशांत महासागरावर जमिनीलगतच्या वातावरणात पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि वातावरणाच्या वरच्या थरात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची बदललेली गती लक्षात घेता एल निनो सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. तीव्रतेच्या अंदाजानुसार, यंदाच्या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात एल निनोची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोचण्याची शक्यता आहे.

El Nino Monsoon: ‘एल निनो’ रोखणार मॉन्सूनची वाटचाल; पर्जन्यमान घटणार, कृषीला फटका शक्य..

येत्या नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान अतितीव्र स्वरूपाचा एल निनो विकसित होण्याची शक्यता ६३ टक्के असून, हा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’पैकी एक राहण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा २.० ते २.५ अंशांत राहण्याची शक्यता अधिक आहे. यंदाचा एल निनो फेब्रुवारी २०२७ मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे ‘सीपीसी’च्या अंदाजात म्हटले आहे. ‘सीपीसी’च्या म्हणण्यानुसार, अतितीव्र स्वरूपाचा एल निनो विकसित होत असला, तरी त्याचे प्रादेशिक परिणाम सर्वच ठिकाणी एकसारखे असतील असे नाही. मात्र, अतितीव्र स्वरूपाचा एल निनो जगात काही भागांवर गंभीर परिणाम करू शकतो, असे यापूर्वी दिसून आले आहे.

भारतातील पर्जन्यमानासाठी चिंताजनक बाब

मॉन्सूनच्या आगमनाबरोबर एल निनो सक्रिय होणे ही भारतातील पर्जन्यमानासाठी चिंताजनक बाब मानली जात आहे. मॉन्सूनच्या प्रगतीपासून ते त्याच्या हंगामातील आचरणावर आता एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात एल निनो पाठोपाठ येणारा २०२७ चा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहून उष्णतेच्या लाटांची संख्या वाढण्याची आणि पुढील वर्षीच्या मॉन्सूनचे आगमनही उशिराने होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.