काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
Tv9 Marathi June 12, 2026 05:45 PM

देशातील काही प्रादेशिक पक्ष, विशेषतः तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विषयावर भाष्य करत विरोधकांवर टीका केली.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. “या चर्चांबाबत बोलताना ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी परिस्थिती दिसते. जो ना काँग्रेसचा आहे, ना राष्ट्रवादीचा आहे, तो यावर सर्वाधिक भाष्य करत आहे,” असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, संबंधित पक्षांचे नेते अनुभवी आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत. त्यामुळे ते कोणताही निर्णय विचारपूर्वकच घेतील. “काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे इतर पक्ष त्यात सहभागी होतील, असं मला वाटत नाही. मात्र राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही,” असे ते म्हणाले.

तसेच, जर अशा प्रकारचे विलिनीकरण झालेच, तर त्याचा भारतीय जनता पक्षाला तोटा होणार नाही, उलट फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. “विरोधी पक्षांची राजकीय जागा कमी झाली, तर त्याचा फायदा भाजपला होईल. त्यामुळे या घडामोडींवर आमची कोणतीही चिंता नाही. आम्ही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस आणि विविध प्रादेशिक पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांमुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.