क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याने निवृत्ती जाहीर केली आहे. केनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. केनने वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. यासह केनच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा शेवट झाला आहे. केनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान निवृत्तीबाबत निर्णय घेत चाहत्यांना झटका दिला. न्यूझीलंड इंग्लंड दौऱ्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. इंग्लंडने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभूत केलं. केनचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना हा अखेरचा ठरला.
केन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय अनुभवी खेळाडूंपैकी एक होता. मात्र केनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याने एका युगाचा अंत झाला आहे. केनने किमान 2 वर्ष खेळायला हवं होतं, असं क्रिकेट चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. केनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने त्याला निरोपही देता न आल्याची खंतही क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
“मी गेल्या काही काळापासून निवृत्तीबाबत विचार करत होतो. मात्र गेल्या काही दिवसात निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचं मला जाणवलं. मी न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळताना प्रत्येक सामन्यात सर्वस्व पणाला लावून खेळलो, याचा मला अभिमान आहे. यापेक्षा कमी योगदान देऊन पुढे जाणं योग्य ठरणार नाही. मी माझ्या स्वतःच्या अटींवर खेळापासून दूर जात असल्याने मला भाग्यवान समजतो”, अशी प्रतिक्रिया केनने निवृत्तीनंतर दिली.
केन न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी आणि अनुभवी फलंदाज होता. केनने 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. केन न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 378 सामने खेळला. केनने या दरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 19 हजार 346 धावा केल्या. केनने या दरम्यान तिन्ही प्रकारात मिळून एकूण 48 शतकं आणि 103 अर्धशतकं झळकावली आहेत.
केनची तिन्ही फॉर्मेटमधील आकडेवारी
तसेच केन न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज होता. केनने न्यूझीलंडसाठी 9 हजारांपेक्षा जास्त कसोटी धावा केल्या होत्या. केनने कसोटीत एकूण 9 हजार 515 धावा केल्या. केनने या दरम्यान 33 शतकं लगावली होती.