IFCI Ltd शेअर किंमत ब्रेकआउट : गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात (Stock Market) भूराजकीय तणाव, महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आव्हानात्मक वातावरण आहे. मात्र, या अनिश्चिततेच्या काळातही सरकारी मालकीच्या ‘आयएफसीआय लिमिटेड’ (IFCI Ltd) च्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. बाजारातील मंदीला मागे टाकत या शेअरने शुक्रवारी थेट ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.
शुक्रवार, १२ जून रोजीच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान आयएफसीआयच्या शेअरने १९.९९ टक्क्यांच्या अप्पर सर्किट (Upper Circuit) मर्यादेला स्पर्श केला आणि तो ८४.५७ रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, कंपनीच्या मुख्य कर्ज व्यवसायात कोणतीही मोठी ऑपरेशनल प्रगती झालेली नसतानाही हा शेअर सुसाट धावत आहे.
आयएफसीआयच्या शेअरमधील या तुफान रॅलीमागे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या बहुप्रतिक्षित इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) बद्दल वाढलेला आशावाद हे मुख्य कारण आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) आगामी १५ जून २०२६ पर्यंत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) कडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) म्हणजेच आयपीओचा प्राथमिक मसुदा दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बातमीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
गुंतवणूकदारांचे मुख्य लक्ष आयएफसीआयच्या थेट मालकीकडे नसून, तिच्या उपकंपनीच्या (Subsidiary) संरचनेवर आहे. आयएफसीआय लिमिटेडकडे ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (SHCIL) मध्ये तब्बल ५२.८६ टक्के हिस्सा आहे. या SHCIL कडे ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ (NSE) चे सुमारे ४.४ टक्के शेअर्स आहेत.
जेव्हा एनएसई (NSE) शेअर बाजारात अधिकृतपणे सूचीबद्ध (List) होईल, तेव्हा एक्स्चेंजच्या वास्तविक बाजार मूल्याची स्पष्टता येईल. एनएसईला मिळणाऱ्या कोणत्याही प्रीमियम व्हॅल्युएशनचा थेट फायदा SHCIL च्या होल्डिंगला आणि पर्यायाने आयएफसीआय लिमिटेडच्या अप्रत्यक्ष हिस्स्याला मिळणार आहे. याच संभाव्य पुनर्मूल्यांकनाचा (Revaluation) फायदा घेण्यासाठी व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी या शेअरवर मोठ्या बोली लावल्या आहेत.
आयएफसीआयच्या शेअरने गेल्या काही महिन्यांत व्यापक बाजार निर्देशांकांना लक्षणीयरीत्या मागे टाकले आहे. गेल्या अवघ्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळजवळ ३५ टक्के नफा मिळवून दिला आहे. वर्ष २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत (YTD) या स्टॉकची किंमत ५५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
आयएफसीआय लिमिटेड (पूर्वीचे इंडिट्रयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही एक सरकारी मालकीची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. भारताच्या औद्योगिक क्षेत्राला आणि पायाभूत सुविधा, उत्पादन व इतर विकास प्रकल्पांना दीर्घकालीन आर्थिक पाठबळ देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सध्या ही कंपनी कर्ज, वित्तीय सल्लागार सेवा आणि धोरणात्मक गुंतवणुकीच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
अस्वीकृती: लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि गुंतवणूक सल्ला नाही.