Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे नवे अलाइनमेंट ? गुप्त मोजणीने संभ्रम; खांब रोवून सर्वेक्षण
esakal June 13, 2026 12:45 PM

सिन्नर: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असतानाच सिन्नर तालुक्यात नव्या मार्गाची मोजणी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक पुणे महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी मार्गादरम्यान ही मोजणी करण्यात आली असून संबंधित ठिकाणी खांबही रोवण्यात आले आहेत. मात्र, ही मोजणी नेमकी रस्त्यासाठी की रेल्वेमार्गासाठी, प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने जमीनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

याबाबत सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी मार्ग आधीच अस्तित्वात आहेत. याशिवाय नाशिक-चेन्नई महामार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे नव्या महामार्गासाठी जागा उपलब्ध नसल्याने सुरू असलेली मोजणी नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठीच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसे असल्यास रेल्वेमार्गाचे अलाईनमेंट पुन्हा बदलले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकल्पाचे आरेखन यापूर्वी चार वेळा बदलल्याची चर्चा असून हे आणखी एक नवे सर्वेक्षण असल्याचे बोलले जात आहे.

महारेल कॉर्पोरेशनमार्फत या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा मार्ग संगमनेर शहराजवळून नेण्याचा निर्णय झाला होता आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, २०२२ मध्ये सत्तांतरानंतर नारायणगाव येथील जीएमआरटी दुर्बिणींना धोका असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने या मार्गास मंजुरी नाकारली. त्यानंतर 'नाशिक-शिर्डी-पुणतांबे-नगर- चाकण' असा पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात आला.

मात्र, या मार्गामुळे नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांतील मूळ प्रवाशांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यास तीव्र विरोध केला. संसदेपासून विधिमंडळापर्यंत विरोध झाल्यानंतर शिर्डीमार्गे प्रस्तावित अलाईनमेंट रद्द झाल्याचे मानले जात होते. दरम्यान, रेल्वेमार्गाचा विषय थंडावल्याची चर्चा सुरू असतानाच मुसळगाव, दातली, खंबाळे, दोडी बुद्रूक, मानोरी आणि कनकोरी परिसरात नव्याने मोजणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मूळ प्रस्तावित मागपिक्षा दक्षिणेकडून नवीन अलाईनमेंट आखण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

माझ्या खंबाळे शिवारातील जमिनीत सुमारे ५० ते ६० मीटर रुंदीची मोजणी करून दोन्ही बाजूंना दगड रोवण्यात आले आहेत. मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

- विठोबा शिंदे, बाधित शेतकरी, दोडी बुद्रूक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.