DRDO च्या वैज्ञानिकांची कमाल, भारताचं स्वत:च्या हक्काच्या आर्यन डोमच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल, महत्वाची चाचणी यशस्वी
Tv9 Marathi June 13, 2026 03:45 PM

इस्रायल प्रमाणे स्वत:च आर्यन डोम विकसित करण्यासाठी भारताने यशस्वी पाऊल टाकलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने सलग तीन इंटसेप्टर मिसाइलच्या यशस्वी चाचण्या केल्या. इंटरसेप्टर मिसाइल म्हणजे शत्रूने डागलेलं मिसाइल हवेतचं संपवणं. स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमच्या दिशेने भारताचं हे एक दमदार पाऊल आहे. बुधवारी आणि गुरुवारी भारताने बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स आणि जहाज विरोधी क्षेपणास्त्र रोखण्याची आपली अत्याधुनिक क्षमता दाखवून दिली. चांदीपूर येथील इंटीग्रेटेड परीक्षण तळावर डीआरडीओने दोन अत्याधुनिक IRBM इंटरसेप्टर मिसाइलच्या यशस्वी चाचण्या केल्या. वातावरणात आणि वातावरणाबाहेरील 2000 ते 5000 किलोमीटर रेंजवरुन येणारी शत्रुची बॅलेस्टिक मिसाइल्स शोधून ती हवेतच नष्ट करण्यासाठी ही इंटरसेप्टर मिसाइल्स बनवली आहेत. या इंटरसेप्टर मिसाइल्सची रेंज लक्षात घेता आंतरखंडीय म्हणजे ICBM क्षेपणास्त्रांसाठी हे इंटरसेप्टर्स बनवले आहेत.

डीआरडीओनेआणखी एक खास नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्राची स्वतंत्र चाचणी केली. नौदल तळावरुन हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. अत्यंत कमी उंचीवरुन समुद्रालगत उड्डाण करणाऱ्या या क्षेपणास्त्राने लक्ष्याच अचूक वेध घेतला. डीआरडीओने या चाचणी बद्दल अजून कुठली अधिकृत घोषणा केलेली नाही. हवाई आणि समुद्री धोक्यांपासून बचाव करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी एकापाठोपाठ एक या चाचण्या करण्यात आल्या.

हे यश इतकं महत्वाचं का?

भारत मिशन सुदर्शन चक्र अंतर्गत एक अभेद्य सुरक्षा कवच बनवत आहे. यात वेगवेगळ्या स्तराच्या एअर डिफेन्स प्रणालीचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने आपलं अभेद्य सुरक्षा कवच जगाला दाखवून दिलं होतं. त्यावेळी S-400 ने महत्वाची भूमिका बजावली होती. S-400 सारखीच भारत स्वत:ची स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करत आहे. त्या दृष्टीने लांब पल्ल्याच्या इंटरसेप्टर मिसाइलच्या या चाचण्या खूप महत्वाच्या आहेत.

भारताचं अजून एक दमदार पाऊल

BMD सिस्टिममध्ये अत्याधुनिक रडार, कमांड सेंटर आणि येणारी बॅलेस्टिक मिसाइल्स शोधून नष्ट करण्यासाठी इंटरसेप्टर मिसाइल्स विकसित करण्यात येत आहेत. भारताचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. वातावरणाच्या कक्षेतील आणि अवकाशातून हल्ल्याचे धोके मोडून काढणं हा भारताचा मुख्य उद्देश आहे. त्या दिशेने भारताने अजून एक दमदार पाऊल टाकलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.