पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! 'एल निनो'मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी...
शिवानी पांढरे June 13, 2026 05:13 PM

पुणे : यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असून देशात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेचे हवामान (El Nino Update) शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी याबाबत माहिती देताना यंदा मान्सून हंगामात सरासरीच्या सुमारे 90 टक्के इतकाच पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सानप यांनी सांगितले की, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी (El Nino Update) आवश्यक वातावरणीय परिस्थिती अनुकूल नसल्याने त्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. पुढील काही दिवस राज्यात व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(El Nino Update)

El Nino Update : पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता लक्षात घेता पेरणीचे निर्णय...

मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी शेतकऱ्यांनी त्यावर अवलंबून राहून घाईघाईने पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्लाही (El Nino Update) त्यांनी दिला. पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता लक्षात घेता पेरणीचे निर्णय काळजीपूर्वक घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असून त्याचा परिणाम शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि संबंधित यंत्रणांनी आगामी काळातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, मान्सूनची पुढील प्रगती आणि पावसाची स्थिती यावर राज्यातील कृषी क्षेत्राचे लक्ष लागले असून आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.(El Nino Update)

El Nino Update : अल निनोमुळे दुष्काळाची भीती वाढली?

एल निनो आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी भूतकाळातील अनेक दुष्काळी परिस्थितींमध्ये एल निनोचा प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. जर मान्सून अपेक्षेपेक्षा कमी झाला, तर पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम धरणांतील जलसाठ्यावरही होऊ शकतो. तसेच जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. परिणामी, अशा परिस्थितीचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही बसू शकतो.

El Nino Update : पूर्वानुभव काय सांगतो?

२००२, २००९ आणि २०१५ या वर्षांमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याची नोंद आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते. याचा मोठा फटका शेतीला होता. काही भागांत दुष्काळी परिस्थितीही निर्माण झाली होती. प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते असे नाही. 

El Nino Update :  मान्सूनच्या वाटेत नवे संकट ?

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय, एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.