वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मे महिन्यात ग्राहक महागाई दरात वाढ झाली असून तो 3.93 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच किरकोळ महागाई दर आणि अन्नमहागाई दरातही मोठी वाढ झाली असून हे दर 4.78 टक्क्यांवर पोहचले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने प्रसारीत केली आहे. गेल्या मे महिन्याच्या तुलनेतील ही वाढ आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात झालेली वाढ आणि अन्नपदर्थांचे वाढलेले दर यामुळे महागाई दरात वाढ असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
2026 हे वर्ष महागाईच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरत आहे. या वर्षाच्या आतापर्यंतच्या पाच महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात महागाई दर आदल्या महिन्यापेक्षा अधिक वाढला आहे. एप्रिल 2026 मध्ये हा दर 3.48 टक्के इतका होता. रेस्टॉरंट सेवेचा महागाई दर मे महिन्यात सर्वाधिक 5.2 टक्क्यांनी वाढला असून खाण्याच्या पदार्थांचे दर वाढल्याने ही परिस्थिती ओढविली असल्याचे दिसून येते. स्वयंपाकाचा गॅस आणि व्यापारी उपयोगाच्या गॅसच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने हॉटेलांमधील खाण्याचे दर वाढले आहेत. मे महिन्यात एकंदर सरासरी महागाई दर 4.78 टक्के इतका आहे. एप्रिल 2026 मध्ये तो 4.2 टक्के इतका होता.
आव्हानात्मक परिस्थिती
यंदा महागाईच्या संदर्भात आव्हानात्मक परिस्थिती आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळ्या दबावाखाली आहेत. त्यामुळे कच्च्या इंधन तेलाचा आणि इंधन वायूचा पुरवठा खंडीत झाला असून भारताला तेलासाठी पर्यायी मार्गांचा आणि स्रोतांचा शोध घ्यावा लागलेला आहे. ही स्थिती आखातातील युद्ध पूर्णत: संपेपर्यंत राहील, असे अनुमान व्यक्त करण्यात येत असून रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य जनता आणि सरकारांना यासंबंधीची माहिती दिल्याचे स्पष्ट केले गेले.