त्या बाळाची वेणी माझ्या डोळ्यासमोर दिसतेय… माळशिरस अपघाताचा थरार सांगताना प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडला
Tv9 Marathi June 15, 2026 04:45 PM

सोलापूरच्या माळशिरस येथे काल भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू ओझाला आहे. तर 7 जण बचावले आहेत. मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक होती. अंगाचा थरकाप उडवणारी होती. प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती दिली. या घटनेचा थरार सांगताना हा प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडत होता. खासकरून अपघातात दगावलेल्या बाळाच्या आठवणीने हा प्रत्यक्षदर्शी धायमोकलून रडत होता.

या प्रत्यक्षदर्शीने माळशिरसमधील अपघाताचा घटनाक्रमच सांगितला. माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 7 जण बचावले आहेत. अपघातातील 6 महिन्याच्या बाळाचा मृतदेह बाहेर काढणारा हा प्रत्यक्षदर्शी धायमोकलून रडला. विहिरीत पडलेल्या गाडीमागे मी होतो. माझ्यासमोर ही गाडी विहिरीत पडली. जवळपास 200 फूट अलीकडून गाडी हेलकावे खाते होती आणि शेवटी ती विहिरीत पडली. गाडी विहिरीत पडली तेव्हा मी गावकऱ्यांना कॉल केला आणि पाण्यात उडी मारली. पाण्यात असलेल्या 3 वर्षाच्या मुलाला बाहेर काढले, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

काही मिनिटात ग्रामस्थ आले आणि त्यांनीही 4 लोकांना बाहेर काढले. या अपघातात मृत्यू पावलेल्या 6 महिन्याच्या बाळाला माझ्या हाताने मी बाहेर काढले. माझ्या डोळ्यात अजूनही पाणी येतंय. त्या बाळाची वेणी घातलेली माझ्या डोळ्यासमोर दिसतेय, असं हा प्रत्यक्षदर्शी म्हणाला. हे सांगताना प्रत्यक्षदर्शी ढसाढसा रडत होता.

गोरे यांचा इशारा

दरम्यान, रस्त्याचे काम निकृष्ठ तसेच तंत्रशुद्ध नसल्याने वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि एमएसआरडीसीच्या काही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

धोकादायक स्पॉट

माळशिरसमधील भीषण अपघातानंतर सातारा-पंढरपूर महामार्गावरील आणखी धोकादायक स्पॉट समोर आले आहेत. याच महामार्गावरील पिलीव गावातून जाणाऱ्या कालव्यावर संरक्षक कठडे नसल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी धोकादायक प्रवास करत आहेत. नीरा उजवा कालव्यावर असलेल्या पुलाला संरक्षक कठडे नसल्याचे समोर आलं आहे. एमएसआरडीसीला वारंवार पत्रव्यवहार करूनही या पुलावर संरक्षक कठडे उभारण्यात आलेले नाहीत. यापूर्वी अनेक वाहने या कालव्यात कोसळलेत. मात्र तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थी देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. माळशिरस पंचायत समितीचे उपसभापतींच्या कुटूंबातील व्यक्तीदेखील याच कालव्यात पडून मृत्यू पावले होते. त्यामुळे येत्या 10 दिवसात या पुलावर कठडा न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.