अर्थखाते फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण, संजय राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचे चोख प्
Marathi June 13, 2026 06:25 PM

संजय राऊत यांच्यावर छगन भुजबळ : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच आहे. आता पाच महिने उलटून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अर्थखात्याची प्रतीक्षा आहे. त्यातच, “अर्थखाते सध्या माझ्याकडेच आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “अर्थखाते फडणवीसांकडे ठेवण्यातच राज्याचे शहाणपण आहे, कारण सध्या हे खाते सांभाळेल असा एकही सक्षम नेता दिसत नाही,” असे राऊत म्हणाले. आता संजय राऊत यांच्या या विधानावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खोचक टोला लगावला आहे.

Sanjay Raut: नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, “कोणाला कोणते खाते द्यावे आणि कोणते खाते आपल्याकडे ठेवावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवणे यातच शहाणपण आहे. राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थखातं सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही. त्यामुळे हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असणे यातच राज्याचे शहाणपण आहे,” असे त्यांनी म्हटले होते.

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: छगन भुजबळांचे चोख प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना टोला लगावला. संजय राऊत सांगतील मग खातेवाटप होत असेल, तर मग काय बोलावं? सुनेत्राताई यात लक्ष घालतील, त्या बोलतील,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. आता छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Chhagan Bhujbal on Sanjay Raut: ‘मला खंत नाही, मी पक्षाचं काम करतोय’

मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसापासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती. भाजपकडून यासंदर्भात लगेच निर्णय होऊ न शकल्याने भुजबळ यांनी राज्यसभेवर जाणे टाळले. त्यामुळे राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मला राज्यसभेवर जायचं होतं. पण, जे आमचे लेकरं आहे, जे कर्तबगार आहे त्यांना पण संधी मिळाली पाहिजे. मी राज्यसभेवर जातो सांगितलं आणि समीर भुजबळ यांना माझ्या जागेवर संधी द्यावी, मंत्रिपद द्यावं, असं माझं मत होतं. वेळ कमी होता म्हणून शक्य झालं नाही. फेरबदल होणार त्यात काही विचार करा, असं माझं मत होतं. पक्षाने निर्णय घेतला आणि जैन यांचं नाव आले. समीर भुजबळ यांनी आधी कुठे काही मागितलं नाही. मला खंत नाही, मी शांत आहे. मी पक्षाचं काम करतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

आणखी वाचा

Sanjay Raut On Ambadas Danve: अंबादास दानवेंनी सांगितलं, ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात; आता संजय राऊतांच्या विधानाची चर्चा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.