Kalyan News : हायप्रोफाईल सोसायटीत पार्किंग वाद विकोपाला ! 'धुरंदर' गँगच्या छळामुळे डॉक्टर कुटुंबाने विकलं घर ?
Tv9 Marathi June 13, 2026 03:45 PM

कल्याण जवळील शहाड परिसरातून एक खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या हक्काच्या पार्किंगमध्ये दुसऱ्याने गाडी उभी केल्याचा विरोध करणे एका डॉक्टर कुटुंबाला भलतेच महागात पडले आहे. शहाड येथील रेजन्सी अवाना सोसायटीत राहणारे डॉ. राकेश जाटव यांनी सोसायटीतील काही लोकांच्या आणि तथाकथित ‘धुरंधर गँग’च्या छळाला कंटाळून आपला आलिशान फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी घरात घुसून दमदाटी करणे, व्हॉट्सअॅपवर टार्गेट करणे आणि लिफ्टमध्ये पाहताच अस्पृश्यासारखी वागणूक देणे, असे गंभीर आरोप डॉक्टरांनी केले आहेत.मात्र, दुसरीकडे सोसायटीचे चेअरमन दिलीप उर्फ जॅक ओछानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, डॉक्टरांनीच आपल्या पत्नीची छेड काढल्याचा आणि प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा उलट आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत

काय आहे प्रकरण ?

शहाड येथील उच्चभ्रू रेजन्सी अवाना सोसायटीच्या कॅलमस विंगमध्ये राहणारे डॉ. राकेश जाटव गेल्या तीन वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. महिनाभरापूर्वी त्यांच्या स्वतःच्या पार्किंगमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीने परवानगीशिवाय गाडी उभी केली. डॉक्टरांनी यावर आक्षेप घेतला आणि सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर वादाची ठिणगी पडली.डॉक्टरांचा आरोप आहे की, या किरकोळ वादावरून वैयक्तिक वैमनस्य ठेवून सोसायटीचे चेअरमन दिलीप उर्फ जॅक ओछानी हे रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नीसह थेट डॉक्टरांच्या घरात घुसले. त्यांनी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. “तुमची येथे राहण्याची लायकी नाही, तुम्हाला येथून काढावेच लागेल” अशी धमकी देत त्यांच्या ३ वर्षांच्या लहान मुलीलाही घाबरवले.

‘धुरंधर गँग’ने डॉक्टर फॅमिलीला केलं लक्ष्य

या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसात एन.सी. (NC) नोंदवली. मात्र, त्यानंतर छळ कमी होण्याऐवजी आणखी वाढला. सोसायटीतील काही जणांनी ‘धुरंधर गँग’ नावाचा गट तयार करून सोशल मीडियावर डॉक्टर कुटुंबाला लक्ष्य केलं. त्यांना प्रत्यक्ष व्यवहारातही बहिष्कृत करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही लिफ्टमध्ये चढलो की समोरचे लोक उतरून जातात, आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक दिली जात आहे, असा उद्विग्न आरोप डॉक्टरांनी केला आहे. या मानसिक त्रासामुळे झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव डॉक्टरांनी घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

चेअरमनने फेटाळले आरोप

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सोसायटीचे चेअरमन दिलीप उर्फ जॅक ओछानी यांनी कॅमेऱ्यासमोर येत डॉक्टरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला ‘धुरंधर गँग’बाबत काहीही माहिती नसून, डॉक्टरांनीच आधी मर्यादा ओलांडल्याचा दावा त्यांनी केला आहे.पार्किंगचा वाद झाला होता हे खरे आहे. मी चेअरमन असल्याने सीसीटीव्ही पाहून ग्रुपवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, डॉक्टरांच्या पत्नीने ग्रुपमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. मी लहान बहीण मानून अरे-तुरे बोललो, तर त्यांनी ‘माझे पती तुमच्या पत्नीला मेसेज करतील’ अशी धमकी दिली. त्यानंतर डॉक्टरांनी रात्रीच्या वेळी माझ्या पत्नीला व्हॉट्सॲपवर ‘तू कशी आहेस? जेवण काय बनवले?’ असे आक्षेपार्ह मेसेज करून छेड काढली.

याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मी त्यांना खाली बोलावले होते, पण त्यांनी घरात बोलावून वाद घातला. स्वतःची चूक लपवण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी ते आता या प्रकरणाला प्रांतिक आणि धार्मिक रंग देत आहेत. त्यांच्या चुकीचे सर्व पुरावे सीसीटीव्हीत कैद आहेत. आणि याप्रकरणी वकिलाच्या माध्यमातून नोटीस पाठवून तक्रार देखील दाखल केल्याचे सांगितले

पाठवलीकायदेशीर नोटीस

आता या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाली असून कायदेशीर नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. एका बाजूला डॉक्टर कुटुंब न्यायासाठी प्रशासनाकडे डोळे लावून बसले आहे, तर दुसऱ्या बाजूला चेअरमनने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डॉक्टरांचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. या उच्चभ्रू सोसायटीतील अंतर्गत वादामुळे परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस तपासातच या वादाचे खरे सत्य समोर येईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.