Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात
esakal June 15, 2026 12:45 PM

रत्नागिरी/मंडणगड : जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या हलक्या पावसाच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना सुरुवात केली होती, मात्र, ‘अल निनो’ सक्रिय झाल्यामुळे पावसाचा प्रवास रोखला गेला असून, सध्या जिल्ह्यात कडकडीत ऊन पडत (Ratnagiri Rain Delay) आहे. तुरळक पावसावर विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या पिकांच्या उगवणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. हा खंड केवळ शेतीबरोबरच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठीही चिंतेचा ठरणार आहे. बियाणे, खते आणि शेतीच्या मशागतीवर हजारो रुपये खर्च करून बसलेला शेतकरी आता चातकासारखी पावसाची वाट पाहात आहे.

Koyna Dam Water Level : महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचे सावट? सर्वात मोठ्या कोयना धरणात उरला फक्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा, पाहा काय आहे स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे ४९ हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी ४,९०० हेक्टरवर धूळवाफेवर (सुरुवातीच्या) पेरण्या केल्या जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.

Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच...

परिणामी, पेरलेले बियाणे करपून जाण्याची भीती व्यक्त होत असून, उर्वरित शेतकऱ्यांनी सध्या पेरण्या थांबवल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका मंडणगड तालुक्याला बसलेला आहे. या तालुक्यात मागील आठवड्यात सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठी झळ बसणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील आठवड्यात दीडशेहून अधिक वाड्यांमध्ये टंचाई जाणवत होती. सध्याच्या परिस्थितीमुळे त्यात भर पडली आहे.

जेथे पाण्याची उपलब्धता आहे, तिथेच सध्या पेरण्या कराव्यात. यंदा पावसाचा खंड (ब्रेक) वाढू शकतो. जिथे पाण्याची सोय नाही, तिथल्या शेतकऱ्यांनी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात. पुढील तीन दिवसांनंतर पाऊस सुरळीत होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

-विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.