Maharashtra News Live Update : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा
Sarkarnama June 15, 2026 01:45 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

'पुण्यात महसूल बदल्यांचा 'ऑपरेशन ट्रान्सफर'

पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागात थेट 'खांदेपालट' करण्याचा धडक निर्णय घेतला असून जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक अशा तब्बल २८५ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज सोमवारी पार पडणार आहे. या बदल्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींना वेग आला असून अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्यांना आता नव्या जागी धाडण्यात येणार आहे.

Sangli Crime : वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश गडदेला अटक

मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामातील वादावरून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश विठोबा गडदे याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत लॉजवर असताना गडदे सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही कारवाई करत त्याला अटक केली.

मुंबई विमानतळाला धमकी, सुरक्षा व्यवस्था वाढवली

मुंबई विमानतळाला शनिवारी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर बॉम्ब शोधक पथकाने विमानतळ परिसर आणि आसपासच्या भागाची तपासणी केली असताही धमकी बनावट असल्याचं समोर आलं.

डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये बराच काळ प्रलंबित असलेल्या शांतता करारावर सहमती झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.