शिंदेंचं नाव नसल्याने नवी मुंबईत वातावरण तापलं, आत गणेश नाईक, बाहेर शिवसैनिक, तिसऱ्यांदा असं झालं ना तर..
GH News June 15, 2026 03:12 PM

नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिक चिडले आहेत. आज विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होत आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रम पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीय. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत आणि गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत. पण नवी मुंबईतील कार्यक्रमाचं गणेश नाईक यांच्या हस्ते उद्गाटन सोहळा सुरु आहे. कार्यक्रम स्थळी गणेश नाईक आतमध्ये आहेत, तर बाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले असून त्यांचं आंदोलन सुरु आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले देशातले महत्वाचे नेते आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची उठबस आहे. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत. गणेश नाईक यांचा हा मतदारसंघही नाही. हा मंदा म्हात्रे यांचा मतदारसंघ आहे तरी उद्घाटन नाईक साहेबांच्या हस्ते होते” अशी खंत शिवसेना नेते विजय माने यांनी बोलून दाखवली.

काय इशारा दिला?

“आता निषेध करत आहोत. एक वाजता प्रशासनाला जाब विचारणार आहोत. एकनाथ शिंदे पालकमंत्री असूनही त्यांना डावलण्यात आलय. ही दुसरी वेळ आहे. तिसरी वेळ पुन्हा असं झालं तर नवी मुंबई महापालिकेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा विजय माने यांनी दिला. “आरोग्य सुविधांसाठी निधी एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के यांनी आणला असा दावा विजय माने यांनी केला. आज एकनाथ शिंदे साहेब नसते तर तुम्ही लाल दिव्याच्या गाडीतून फिरु शकला असता का?” असा सवाल विजय नाईक यांनी गणेश नाईकांना विचारला.

गणेश नाईक यांनी या वादावर काय उत्तर दिलं?

कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. या कार्यक्रम पत्रिकेवर आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. या बद्दल गणेश नाईक यांना विचारलं असता ‘मला त्याची कल्पना नाही. आपण महापालिका आयुक्तांना विचारा’ असं उत्तर त्यांनी दिलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.