Raakh Review: सध्या ओटीटीवर दर आठवड्याला चार-पाच सिरीयल किलर फिरताना दिसतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर , खून होतात, कथा शेवटपर्यंत फिरवली जाते आणि मग अचानक कोणालाही सिरीयल किलर बनवून तुमच्यासमोर उभं केलं जातं. सुरुवातीला हे सगळं धक्कादायक वाटलं, आवडलंही. पण आता त्याच त्याच फॉर्म्यूलाचा कंटाळा येऊ लागला आहे. सध्या ओटीटीही याच वाटेवरून जाऊ लागलंय जिथून चित्रपटसृष्टी जात आहे. दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि शो येत आहेत, जे बहुतेकदा अतिशय खराब किंवा सरासरी कामगिरी करतात. मात्र, 'राख' ही क्राईम थ्रिलर (Crime Thriller) सिरिज यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम सिरिज ठरते. या सिरीजमध्ये काही नवे प्रयोग करण्यात आले आहेत. शो साधा ठेवण्यात आलाय. कथा तुम्हाला आधी समजली तरीही तुमची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. सातव्या एपिसोडमध्ये तुम्हाला वाटेल की सीरिज संपली, पण आठवा आणि शेवटचा एपिसोड या संपूर्ण सिरीजला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. (Rakh Review)
दिल्लीमधून दोन मुलं बेपत्ता होतात. ही दोघं भाऊ-बहीण असून सैन्यातील एका अधिकाऱ्याची मुलं असतात आणि ते रेडिओ स्टेशनकडे जात असतात. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. या तपासादरम्यान काही खूनही होतात. आता हे खून कोण करतंय? ज्यांनी या मुलांचं अपहरण केलं, तेच लोक आहेत का? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्राइम व्हिडीओवर ही सीरिज तुम्हाला पाहता येईल. येथे तुम्ही या सीरिजचे 8 एपिसोड पाहू शकता.
ही एक दमदार क्राइम सीरिज आहे. अनेक बाबतीत ती 'पाताल लोक'लाही टक्कर देते आणि त्यामागचं कारण म्हणजे ही सीरिज 'पाताल लोक'च्या निर्मात्यांनीच बनवली आहे. ही सीरिज स्वतःला गरजेपेक्षा जास्त गुंतागुंतीची बनवण्याचा प्रयत्न करत नाही. या सीरिजचं साधेपण हेच तिचं बळ आहे. कोणतंही अनावश्यक गोंगाट करणारं संगीत नाही, कोणतीही धक्कादायक एन्ट्री नाही. फक्त दमदार लेखन आणि कमाल अभिनय!
1978 मधील दिल्ली ज्या बारकाईने दाखवली आहे, ती पाहण्यासारखी आहे. त्या काळातल्या बस, फोन, घड्याळं, गाड्या हे सगळं तुम्हाला जुन्या काळात घेऊन जातं. ही सीरिज फक्त खुनी शोधत नाही, तर तो विचार कसा करतो आणि त्याचा मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करते. ही सीरिज तुम्हाला सस्पेन्सपेक्षा तपासाच्या पद्धतीने जास्त गुंतवून ठेवते. त्या काळात फॉरेन्सिक सायन्स नुकतीच सुरू झाली होती. लोकांना 'फॉरेन्सिक' हा शब्द बोलताही येत नव्हता. हे सगळं कसं सुरू झालं, हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे सातव्या एपिसोडमध्ये तुम्हाला वाटेल की सगळं संपलं, आता पुढे काय? पण शेवटचा एपिसोड तुम्हाला अशी भावना देऊन जातो की तुम्ही बराच वेळ त्यावर विचार करत राहता.
अली फझलने जयप्रकाश या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनयांपैकी एक म्हणावा लागेल. हा 'सिंघम' किंवा 'दबंग'सारखा नायक नाही. तो शांत, प्रामाणिक आणि आपल्या कामाशी निष्ठावान असलेला पोलिस अधिकारी आहे. 'मिर्झापूर'मधील गुड्डू भैय्याची प्रतिमा त्यांनी या भूमिकेतून पूर्णपणे मोडून काढली आहे.
आमिर बशीरने बेपत्ता झालेल्या मुलांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे आणि त्यांचा अभिनय तुम्हाला रडवू शकतो. एका वडिलांचं दुःख त्यांनी ज्या पद्धतीने साकारलं आहे, ते मन हेलावून टाकणारं आहे.सोनाली बेंद्रेचा स्क्रीन टाइम कमी आहे, पण त्या कमी वेळेतही त्या प्रभाव टाकतात. एका आईचं दुःख त्यांनी अत्यंत भावनिक पद्धतीने साकारलं आहे. राकेश बेदी यांनी अलीच्या वडिलांची भूमिका केली आहे. त्यांना आपल्या मुलाच्या जेवणाची सतत काळजी असते. त्यांचं कामही जबरदस्त आहे.
आकाश मखीजा आणि रमणदीप यादव यांनी या सीरिजमधील दोन खलनायक - बाबू आणि रज्जो या खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा अभिनय इतका प्रभावी आहे की ते पडद्यावर दिसले की अंगावर काटा येतो. ते इतके क्रूर आणि धोकादायक आहेत की ही सीरिज पाहिल्यानंतर ते तुम्हाला कुठे दिसले तर तुम्ही घाबराल किंवा त्यांच्यावर राग काढाल. त्यांचा अभिनय खूपच चांगला आहे. त्यांनी असा दहशतीचा माहोल निर्माण केला आहे की अंगावर शहारे येतात. ओटीटीच्या दुनियेला या सीरिजमधून दोन नवे खलनायक मिळाले आहेत. अंशुल चौहानने पत्रकाराच्या भूमिकेत चांगलं काम केलं आहे. दिव्या शर्मा आणि विवान शर्मा यांनीही अप्रतिम अभिनय केला आहे. हे दोघं अनुक्रमे सुमन आणि साहिलच्या भूमिकेत आहेत. हीच दोन्ही मुलं बेपत्ता होतात आणि त्यांचा अभिनय तुम्हाला भावूक करतो.
अनुषा नंदकुमार, संदीप साकेत आणि प्रोसित रॉय यांनी मिळून या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. आणि हे तिघेच या सीरिजचे खरे हिरो आहेत. त्यांनी कथेला पुढे ठेवलं, कोणत्याही पात्राला नाही आणि हीच या सीरिजची सर्वात मोठी खासियत आहे. त्यांनी गोष्टींना गरजेपेक्षा जास्त गुंतागुंतीचं करण्याचा प्रयत्न केला नाही आणि अशी एक सीरिज तयार केली आहे जी क्राइम शोच्या बाबतीत एक आदर्श ठरू शकते.
एकूणच काय तर, ही सीरिज कोणत्याही परिस्थितीत पाहायलाच हवी अशी आहे.
रेटिंग - 4 स्टार्स