Jalgaon News : रविवारची सुटी अन्‌ पोहण्याचा मोह बेतला जिवावर; भुसावळच्या तरुणाचा वाघूर धरणात बुडून मृत्यू
esakal June 15, 2026 11:45 PM

जळगाव - रविवारची सुटी घालविण्यासाठी मित्रांसोबत आलेल्या भुसावळ येथील २६ वर्षीय तरुणाचा वाघूर धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १४) घडली. धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न अल्याने पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला.

वाघूर धरणात भुसावळ येथील मोहंमद कैफ, अदनान खान (रा. मटन मार्केट, शिवाजीनगर, भुसावळ) व मोहंमद आवेश अब्दूल गफर- गवळी (वय २६, रा. स्टेशनजवळ, १२ इमामजवळ, गवळीवाडा, भुसावळ) असे तिघे मित्र पीकनिकचा बेत आखून आले होते.

दोघांना वाचविण्यात यश

तप्त उन, प्रचंड उकाडा व समोर नजर जाईल तिथवर पाणी पाहून तिघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. मोहंमद कैफ व अदनान खान यांना वाचविण्यात यश आले. मात्र, मोहंमद आवेश अब्दुल गफर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धरणाच्या जलसाठ्यात बुडालेला मोहंमद भुसावळ रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याची माहिती परिचितांनी दिली.

मृतदेह सापडल्यावर गफूर तडवी, मुकुंदा पाटील, गजू महाजन, रायपूर येथील पोलिसपाटील रामसिंग परदेशी, रायपूर ग्रामपंचायतीचे सदस्य वसंत धनगर, तलाठी निधी मानेकर, मंदा सोनवणे, तलाठी भावेश रोहिमारे, कंडारी येथील पोलिसपाटील कैलास सुर्वे व ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला.

भुसावळ येथील शेख रिझवान शकीर याने सायंकाळी साडेसात ते रात्री आठच्या सुमारास मोहंमद आवेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृताच्या चुलत भावाने मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथील नातेवाईक, कुटुंबीय व परिचितांनी घटनास्थळ आणि त्यानंतर जळगाव जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.