प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
सूरज सावंत June 16, 2026 12:13 AM

मुंबई : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit more) आणि केईएमची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता, स्टटँड-अप कॉमेडी शोदरम्यान करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस (cyber police) ठाण्याने कॉमेडियन प्रणीत मोरे, मुंबईतील सेजल पवार आणि गुरुग्राम येथील प्रेक्षक हिमांशू जांगडा यांना 16 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार प्रणीत मोरे आणि सेजल पवार हे मंगळवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणार नाहीत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दोघांनीही तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून 17 जून रोजी आपले जबाब नोंदवून देण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे त्यांचे जबाब आता बुधवारी नोंदवले जाणार आहेत.

महाराष्ट्र सायबरने या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिप्समधील कथित वक्तव्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. तक्रारदारांनी या वक्तव्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी हिमांशू जांगडा यांनाही नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना नव्याने समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींविरुद्ध समान कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. तपास पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने सुरू असून कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्र सायबर प्रणीत मोरे यांच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट व सामग्रीचीही छाननी करत आहे. त्यांच्या कोणत्याही पोस्टमधून कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे का, याची पडताळणी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रणित मोरेचा माफीनामा

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच प्रणित मोरेने व्हिडिओ शेअर करत माफी मागितली होती. सेजल पवार हिच्यावरही केईएम रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं आहे. तर, हिमांशू जांगडाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.

Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.