वृत्तसंस्था/ कोलकाता
टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची सोमवारी कोलकाता येथील ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. शालेय नोकऱ्यांसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी अभिषेक यांची चौकशी करत आहे. याप्रकरणी त्यांना 3 जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसमध्ये त्यांना 15 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एजन्सीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्हीच्या आरोपपत्रांमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे नाव आहे. यापूर्वी रविवारी, आमदारांच्या बनावट सह्या प्रकरणात सीआयडीने अभिषेक यांची आठ तास चौकशी केली होती. या प्रकरणात अभिषेक मंगळवार, 16 जून रोजी पुन्हा सीआयडीसमोर हजर होणार आहेत.
कोलकाता पोलिसांनी 13 जून रोजी पहाटे 3 वाजता अभिषेक यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी छापा टाकला होता. पोलीस पथकासोबत केंद्रीय दलाचे जवानही आले होते. ही शोधमोहीम सुमारे चार तास चालली. धाडीची माहिती मिळताच, ममता बॅनर्जी तात्काळ अभिषेकच्या घरी गेल्या, थोडा वेळ थांबल्या आणि नंतर निघून गेल्या. पोलिसांच्या सूत्रांनुसार, अभिषेकचा वैयक्तिक सहाय्यक सुमित रॉय याला शोधण्यासाठी ही धाड टाकण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी घरात घुसून प्रत्येक खोलीची झडती घेतली. बनावट सही प्रकरणात अभिषेकविरुद्ध सुरू असलेल्या सीआयडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या घरावर ही धाड टाकण्यात आली होती.