विराट कोहली किंवा शुबमन गिल नाही, स्मृती मंधाना 'या' यादीच्या टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय
Marathi June 16, 2026 09:25 PM

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. हाय-व्होल्टेज सामन्यात भारताच्या या महत्त्वपूर्ण विजयात स्मृती मंधानाने उल्लेखनीय कामगिरी केली. तिने ४४ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. भारताचा आता पुढील सामना १७ जून रोजी नेदरलॅंड्स विरुद्ध आहे. या सामन्याआधी स्मृतीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

स्मृतीने प्रतिष्ठीत टाइम मॅगझीनच्या १०० सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या विशेष यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. टाइमच्या २०२६ च्या १०० सर्वात प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि गुंतवणूकदारांचा समावेश आहे. यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि वनडे-कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलचा समावेश नाही.

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारी खेळाडू आहे. तसेच या फॉरमॅटमध्ये ती दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू (४४०१) आहे.

या यादीत अमेरिकन बास्केटबॉल दिग्गज लेब्रॉन जेम्स, फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, चायनीज-अमेरिकन स्कीयर आयलीन गु, टेनिस स्टार कार्लोस अल्कारझ, बास्केटबॉलपटू व्हिक्टर वेंबन्यामा, दिग्गज गोल्फर रॉरी मॅकिलरॉय, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार टेंबा बावुमा यांचा समावेश आहे. तसेच न्यूयॉर्क निक्सचा बास्केटबॉलपटू जेलेन ब्रन्सन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो हे पण या यादीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.