RBI ची मोठी कारवाई! 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी, पैसे काढण्यावरही मर्यादा, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
एबीपी माझा वेब टीम June 16, 2026 11:13 PM

RBI News : नियमांचा भंग करणाऱ्या अनेक बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सातत्याने कारवाई करत असते.  आपल्या अंतर्गत कार्यरत असलेल्या बँकांवर RBI चे बारकाईने लक्ष असते. तसेच, काही चूक झाल्यास कठोर कारवाईही करते. अशातच आता RBI ने आता मुंबईतील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर बंदी घालण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे. नेमकं प्रकरण काय याबाबतची सविस्तर माहिती घेऊयात. 

RBI चे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरही बारकाईने लक्ष 

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आपल्या ग्राहकांच्या हिताची अत्यंत काळजी घेते. याशिवाय, ती खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरही बारकाईने लक्ष ठेवते. जेव्हा बँका काही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आरबीआयला आढळते, तेव्हा ती कठोर कारवाई करते. अशीच एक घटना नुकतीच घडली, जेव्हा आरबीआयने एका बँकेवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली.

कोणत्या बँकेवर बंदी घालण्यात आली?

भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित मोगावीरा सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेची खालावलेली आर्थिक स्थिती हे यामागील मुख्य कारण आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हे निर्बंध शुक्रवार, 12 जून रोजी कामकाज संपल्यानंतर लागू झाले असून ते सहा महिने लागू राहतील. आवश्यक असल्यास त्यांचा आढावा घेतला जाईल.

मोगावीरा सहकारी बँक आता कोणतेही नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही

आरबीआयच्या निर्देशांनुसार, मोगावीरा सहकारी बँक आता कोणतेही नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही. तसेच विद्यमान कर्जांचे नूतनीकरण (रिन्यूअल) करू शकणार नाही. तसेच बँकेला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करता येणार नाही. नवीन आर्थिक दायित्वे स्वीकारणे, कर्ज घेणे किंवा नवीन ठेवी स्वीकारणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने ही बंधने लादताना म्हटले की, बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेऊन ठेवीदारांना त्यांच्या बचत, चालू किंवा इतर कोणत्याही खात्यातून कमाल 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात येईल.

ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी घेतला निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, बँकेच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही सातत्याने संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो. मात्र, बँकेने नियामकांच्या चिंता दूर करण्यासाठी किंवा ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे हे कठोर निर्बंध लावणे गरजेचे आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.