अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा June 17, 2026 12:13 AM

बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं हिंमतीच्या जोरावर नाव कमवत असलेली अभिनेत्री, छावा फेम संचिता उगले (Sanchita ugale) 14 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली तसेच, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी तिच्या मृत्यूचा संदर्भही जुळून आला. कारण, सुशांतनेही 14 जून रोजीच आपलं जीवन संपवलं होतं. संचितानेही त्याच दिवशी जीव दिला. मात्र, तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, तिच्या आत्महत्येच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे. त्यातच, आता संचिताचा तिच्या मुंबईतील (Mumbai) एका सहकलाकाराशी झालेला संवाद समोर आला आहे. त्यावरुन, उज्ज्वल शर्माकडून तिचा छळ होत होता, असा आरोप संचिताच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

'छावा' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री संचिता उगले हिनं नालासोपारा येथील तिच्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. संचिता गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होती, तिला अनेकदा आत्महत्येचे विचार मनात डोकावायचे, असं तिची सहकलाकार मैत्रिण मेघा शर्माने सांगितलेलं. पण आता संचिताच्या निधनानंतर तिच्या मावशीने आणि वडिलांनी सिनेसृष्टीतील काही जणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इंडस्ट्रीतील काही लोकांकडून तिला मानसिक त्रास दिला जायचा, टॉर्चर केलं जायचं असा आरोप अभिनेत्रीच्या मावशीने केलाय. तिच्या वडिलांनीही संचिता पैशांच्या व्यवहारामुळे नैराश्यात गेल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यातच, आता संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर आले आहे. 

उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर 

संचिता मृत्यू प्रकरणात आता ‘उज्ज्वल शर्मा’ची एंट्री झाली असून उज्ज्वल शर्मा हाच संचिताचा छळ करत होता, तिच्याकडून पैसे घेत होता आणि परत करताना अपमानास्पद बोलत होता, अशी माहिती समोर आली आहे. उज्ज्वल शर्माचे हे मेसेज आता समोर आले आहेत,  जे उज्ज्वल शर्माने संचिता हिला पाठवले होते. ‘साजन घर’ या मालिकेच्या सेटवर उज्जल हा संचिताचा सहकलाकार होता. जर उज्ज्वल चॅटमध्ये संचिता हिच्याशी अशाप्रकारे बोलत असेल, तर सेटवर त्याचे वर्तन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. संचिताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामागे उज्ज्वलच कारणीभूत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. 

कुटुंबीयांचा आरोप, उज्ज्वलनेच त्रास दिला

उज्ज्वलने आधी पैसे मागितले आणि मदत मिळाल्यानंतरही तो संचिता हिच्याशी अशा प्रकारे वागत होता, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. संचिता आणि उज्ज्वल यांच्यातील संबंधांचे सत्य समोर यावे यासाठी आम्ही निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहोत, असे संचिताच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर उज्ज्वलने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही, तसेच तो कुटुंबीयांना भेटायलाही आलेला नाही. उज्ज्वल आमच्या मुलीला सतत त्रास देत होता, त्यामुळे ती नैराश्यात (डिप्रेशनमध्ये) गेली होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.