Vantara statement on Madhuri : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या नांदणी येथील 'महादेवी' उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षभरापूर्वी गुजरातमधील वनतारा येथे दाखल झालेल्या माधुरीने उपचार, पुनर्वसन आणि विशेष देखभालीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून, आता ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याने कोल्हापूरातील तिच्या घरी परतण्यास सज्ज झाली आहे.
याबाबत वनताराने मंगळवारी निवेदन प्रसिद्ध केले, "एक वर्षापूर्वी माधुरी वनतारा येथे आली होती. तेव्हापासून तिला विशेष काळजी, आरामदायी वातावरण आणि आवश्यक आधार देण्यात आला. पशुवैद्यकीय तज्ज्ञ, देखभाल कर्मचारी, आहारतज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांच्या समर्पित पथकाने तिच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक लक्ष, कौशल्य आणि प्रेम दिले," असे नमूद करण्यात आले आहे.
माधुरीला अधिक चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळावी, यासाठी वर्षभर सातत्याने प्रयत्न करण्यात आले. तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. योग्य आहार, नियमित वैद्यकीय तपासण्या आणि तज्ज्ञांच्या देखरेखीमुळे तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे वनताराने स्पष्ट केले आहे.
View this post on InstagramA post shared by Vantara (@vantara)
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आज माधुरी पूर्वीपेक्षा अधिक सशक्त आणि निरोगी झाली असून, वनतारामधील तिचे तात्पुरते निवासस्थान सोडून कोल्हापूरातील तिच्या खऱ्या घरी परतण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरातील भाविक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल"माधुरीची उपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल. मात्र, ती निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि तिला मिळायला हवे असलेल्या प्रेमळ वातावरणात नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचा आनंद यापेक्षा मोठा नाही," असे वनताराने म्हटले आहे.
प्रत्येक प्राण्याला उपचार, पुनर्वसन आणि अधिक चांगले जीवन मिळवून देण्याच्या उद्देशाने वनतारा कार्यरत असून, प्रत्येक प्राण्याला बरे होण्याची, भरभराट करण्याची आणि सुरक्षित आयुष्य जगण्याची संधी मिळावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.