IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून
esakal June 17, 2026 10:45 PM

भारतीय अ संघाने बुधवारी (१७ जून) अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध झालेल्या तिरंगी वनडे मालिकेतील शेवटच्या साखळी सामन्यात १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सगल दोन सामन्यातील पराभवानंतर भारताने हा मोठा विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे भारताचे ४ गुण झाले असून नेट रन रेटही चांगला आहे. त्यामुळे भारताने आता अंतिम सामन्यासाठी दावेदारी ठोकली आहे.

या सामन्यात भारतीय अ संघाने अफगाणिस्तान अ संघासमोर ३२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ३६.५ षटकात सर्वबाद २१८ धावा केल्या. अफगाणिस्तानचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता.

अंतिम सामन्यासाठी समीकरण

आता या तिरंगी मालिकेत भारतीय संघाचे साखळी फेरीतील चारही सामने संपले आहेत, तर अफगाणिस्तान आणि यजमान श्रीलंका अ संघाचा सामना बाकी आहे. श्रीलंकेने तीन पैकी २ सामने जिंकल्याने त्यांचेही ४ गुण आहेत. अफगाणिस्तानचे २ गुण आहेत. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला, तर श्रीलंका आणि भारत यांच्यात अंतिम सामना होईल. कारण श्रीलंकेचे ६ गुण होतील आणि भारताचे ४ गुण असल्याने हे दोन संघ पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन क्रमांकावर राहतील. पण जर अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केले, तर मात्र तिन्ही संघ ४ गुणांवरच असतील. अशात ज्या दोन संघांचा नेट रनरेट चांगला असेल, ते दोन संघ अंतिम सामन्यात खेळतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.