हडपसर - व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत हडपसर येथील क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रवीण पाटील यांनी यशस्वी कामगिरी करत आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला आहे. साडेआठ तासांच्या निर्धारित वेळेसाठी असलेली ही स्पर्धा सात तास पस्तीस मिनिटांत पूर्ण करून त्यांनी आपल्या विजयाची मोहोर उमटवली.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकल चालवणे आणि २१.१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन धावणे अशा एकूण ७०.३ मैलांच्या सहनशक्तीचे आव्हान असते.
डॉ. पाटील यांनी चार वर्षांपूर्वी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, पाण्याची भीती आणि पोहता न येणे हा त्यांच्या ध्येयातील मोठा अडसर ठरत होता. असे असतानाही त्यांनी जिद्दीने सहा महिने अत्यंत शिस्तबद्धपणे वेळेचे नियोजन करीत प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, नियमित सराव आणि मानसिक तयारीच्या जोरावर त्यांनी भीतीवरही मात करीत यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. त्यांचा हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
प्रमुख प्रशिक्षक म्हणून डॉ. योगेश सातव यांनी डॉ. पाटील यांना मार्गदर्शन केले. याशिवाय पत्नी मनिषा, मुले भूमिका व ओजस यांच्यासह प्रमोद झेंडे, नीता धमेजानी, ओमकार जोकर तसेच, रनहोलीक्स ग्रुप मधील सर्व सदस्यांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य केले.
डॉ. पाटील म्हणाले, 'आयर्नमॅन सारख्या मोठ्या आव्हानात्मक स्पर्धेत आपणही सहभागी व्हावे, असे अनेकदा वाटत असे. मात्र पाण्याची भीती वाटणारा मी समुद्रात कधीही पोहलेलो नव्हतो. तरीही चार वर्षापासून मी त्या तयारीला लागलो. शिस्त, सातत्य आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर कोणतीही भीती जिंकता येते, असे मनोमन ठरवले. दर रविवारी पोहणे, सायकलींग, धावणे, असा सराव सुरू केला. दोन-तीन वेळा थेट समुद्रातही सराव केला. डॉ योगेश सातव यांनी सतत प्रेरणा दिली. त्यामुळे नुकतीच ही आव्हानात्मक स्पर्धा मी पूर्ण केली, याचा आनंद होत आहे.'