सहा खासदारांनंतर आता मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? शिंदे गटाच्या नेत्याच्या खळबळजनक दाव्याने
Marathi June 18, 2026 03:25 PM

शिवसेनेचे ऑपरेशन टायगर: महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा पातळीवर ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटल्याची चर्चा आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मोर्चा थेट मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) वळवला आहे. दिल्लीतील भूकंपानंतर आता मुंबई पालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक (Corporators) हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे (Kiran Landge) यांनी केला आहे.

Shivsena Operation Tiger: “कधी प्रवेश करायचा?” नगरसेवकांकडून विचारणा

शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ठाकरे गटाचे 20 पेक्षा जास्त माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, “पक्षात केव्हा आणि कधी प्रवेश करायचा आहे?” अशी विचारणा या नगरसेवकांकडून केली जात आहे. या नगरसेवकांबाबत लवकरच योग्य तो वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. हे 20 नगरसेवक अधिकृतपणे शिवसेनेत सामील झाल्यावर पालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ आणि ताकद मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

Shivsena Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ची 21 जूननंतर अधिकृत घोषणा?

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणाचा सोहळा 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त होण्याची दाट शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी अद्याप शिल्लक असल्याने हा निर्णय काही काळ पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. आता 21 जूननंतर या 6 खासदारांच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान दोन-तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या हालचालींमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली दरबारी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Shivsena Operation Tiger: लोकसभा अध्यक्षांकडे पत्र, पण सस्पेन्स कायम

ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र किंवा फोटो अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाहीत. त्यामुळे, “आपल्या खासदारांविरोधात तूर्तास कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका,” अशा कडक सूचना मातोश्रीवरून सर्व नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Shivsena Operation Tiger: ठाकरे गटाची आज नवी दिल्लीत तातडीची बैठक

या सर्व राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज नवी दिल्लीत सकाळी 11 वाजता संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक म्हणजेच खासदारांच्या एकनिष्ठतेची महत्त्वाची कसोटी मानली जात आहे. शिंदे गटासोबत 6 खासदार नसल्याचा ठाम विश्वास ठाकरे गटाला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाकडून सर्व खासदारांना ‘व्हीप’ (Whip) जारी करण्यात आला आहे. 6 पैकी 2 खासदारांनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Operation Tiger)

  • 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
  • अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
  • 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
  • 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
  • 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
  • अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
  • नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
  • ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
  • 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
  • 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
  • फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
  • 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
  • ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Operation Tiger Shivsena MP)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Omraje Nimbalkar: मोठी बातमी: ‘ओमराजे निंबाळकर कोणत्याही बैठकीला जाणार नाहीत’; ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला न जाण्याचं कारणही सांगितलं, म्हणाले…

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.