Omraje Nimbalkar : दुसर्‍या पक्षातून येऊनही उद्धव ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं, शेवटी त्या ओमराजे निंबाळकर, संजय पाटलांकडून विश्वासघात
Tv9 Marathi June 18, 2026 03:45 PM

चार वर्षात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या गटात फूट पडली आहे. याआधी 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं होतं. दोन वर्षांपूर्वी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले आहेत. आता फक्त तीन खासदार उद्धव ठाकरे गटाकडे उरले आहेत. सहाखासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील या दोन खासदारांकडून ठाकरे गटाला अपेक्षा होती. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला तडा दिला. शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश अष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख आणि निंबाळकर, पाटील हे सहा खासदार फुटले आहेत. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय. आज उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी करुन बैठक बोलावली होती. पण सहाही खासदार अनुपस्थित राहिले. एकप्रकारे यातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यावर शिक्कामोर्तब झालं.

ओमराजे निंबाळकर यांची राजकीय कारकिर्द घडवण्यात उद्धव ठाकरे यांची महत्वाची भूमिका आहे. 2006 साली वडिल पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर वयाच्या 22-23 व्या वर्षी नाईलाजाने ओमराजे यांना राजकारणात प्रवेश करावा लागला. आधी जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांनी चुणूक दाखवली. त्यानंतर 2009 साली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले.

पण आता त्यांनी निर्णय बदलला

पुढे 2019 आणि 2024 मध्ये शिवसेना आणि उद्धव गटाच्या तिकीटावर खासदार बनले आणि आता दोन वर्षात बंडखोरी करुन एकनाथ शिंदेंकडे गेले. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून पाहिलं जायचं. चारवर्षापूर्वी शिंदे फुटले, त्यावेळी ठामपणे त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती. पण आता त्यांनी निर्णय बदलला.

ते स्वगृही परततील असं वाटत होतं

दुसरे खासदार संजय दीना पाटील यांच्याकडूनही ठाकरेंना अपेक्षा होती. मूळात संजय दीना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले होते. त्यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात घेऊन खासदार बनवलं. पण आता त्यांनी सुद्धा विश्वासघात केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोपवलेल्या पत्रात संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचं बोललं जात होते. त्यामुळे ते स्वगृही परततील असं वाटत होतं. पण व्हीप बजावूनही ते बैठकीला पोहोचले नाहीत. यावरुन त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.