NCPI Offer to Uddhav Thackeray Shivsena Rebel MPs: पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलात त्रिपुरातील एका पक्षाने मोठी भूमिका निभावली. ममता दीदींच्या बंडखोरांनी याच पक्षात त्यांचा गट विलीन केला. तर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटल्याने नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) चर्चेत आली आहे. या पक्षाने उद्धव ठाकरे शिवसेनेतील फुटीर खासदारांना त्यांच्या पक्षात विलीन होण्याची ऑफर दिली आहे. फारसा कुणाला परिचित नसलेला हा पक्ष टीएमसीतील बंडखोरांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर अचानक समोर आला.
उद्धव सेनेच्या बंडखोरांचे स्वागत
पक्षाने त्यांच्या एक्स हँडलवर याविषयीची पोस्ट केली आहे. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांचे स्वागत करतो आणि त्यांना आमच्या पक्षात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे पक्षाने म्हटले आहे. या पक्षाने अजून एका दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांच्या खासदारांची संख्या वाढणार असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार त्यांच्या खासदारांची संख्या 20 वरून 22 करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर त्यापूर्वी तृणमूल बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सुद्धा NCPI ची लोकसभेतील ताकद वाढणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अथवा पूर्वोत्तर राज्यातील अजून दोन खासदार नव्याने या पक्षात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
NCPI चे अध्यक्ष तरी कोण?
एकाएक हा पक्ष देशाच्या राजकीय कॅनव्हासवर आला आहे. पण NCPI चे अनेक संस्थापक सदस्य हे त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांनाच ओळखत नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान NCPI पक्षाच्या बैठकीत उद्धव सेनेच्या बंडखोर खासदारांना पक्षात घ्यावे की नाही यापेक्षा नवीन अध्यक्ष ज्योतिप्रकाश चॅटर्जी कोण आहेत यावरच मोठी चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
अनेक संस्थापक सदस्यांना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत याविषयी संभ्रम कायम आहे. तर अध्यक्षांचा फोटोही समोर आलेला नाही. त्यांची एक सावली फेसबुक पोस्टमध्ये दिसून येते. त्यामुळे या नवीन पक्षाचे अध्यक्ष कोण हाच मोठा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. या पक्षाचे एक पदाधिकारी शांतनु डे यांन यांनी सांगितले की, ज्योतिप्रकाश चटर्जी हे कोलकता हायकोर्टातील एक वकील असल्याची माहिती त्यांना आतापर्यंत मिळाली आहे. दरम्यान या पक्षाचे आठ संस्थापक सदस्यांची एक बैठक नुकतीच झाली. त्यात उद्धव सेनेच्या फुटीर खासदारांना पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.