Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न
esakal June 18, 2026 06:45 PM

बुलडाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस राज्यभरातील उग्र निदर्शने, संतप्त प्रतिक्रिया आणि नाट्यमय घटनांनी गाजला. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या रात्रीपासून तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळपर्यंत बुलडाणा जिल्ह्यासह विविध भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा आता गावोगावी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. चिखली-खामगाव मार्गावरील पेठ येथील पुलावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी टायर पेटवून आंदोलन केले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यरात्री खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तिसऱ्या दिवशी आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. जळगाव जामोद येथे अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. हातात फलक घेऊन शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे पोलिस आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

उदयनगरात पाण्याच्या टाकीवर आंदोलन

चिखली तालुक्यातील उदयनगर येथे शेतकरी आंदोलकांनी थेट पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी टाकीवरून घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

बुधवारी (ता.१७) दुपारी साडेदोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले होते. जिल्हाधिकाऱ्यांना सातबाऱ्याचे वाण देण्यासाठी ॲड .शर्वरी तुपकर शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अडवण्यात आलेल्या आंदोलकांनी संतप्त होत दूध, कांदे, टोमॅटो आणि विविध भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान अंत्री खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर या तरुण शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच ताब्यात घेतले आणि आगपेटी जप्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.