महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, सरकार मात्र खासदार, आमदार फोडण्यात व्यस्त, वडेट्टीवारांचा हल्लाबोल 
राजू सोनावणे June 19, 2026 09:13 PM

Vijay Wadettiwar : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाच सावट आहे. कारण पावसानं मोठी ओढ दिली आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यावाचून जळू लागली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. कधी पाऊस पडणार? हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान, याच स्थितीवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते पाहुयात. 

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, महायुती सरकार मात्र खासदार, आमदार फोडण्यात व्यस्त

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, धरणांतील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे,  शेतकरी हवालदिल झाला आहे, शहरातही पाणीकपात सुरू झाली आहे. पण महायुती सरकार मात्र खासदार, आमदार फोडण्यात व्यस्त आहेत अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

पावसाळी अधिवेशन तोंडावर, आमदार निवासातच अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई

परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना आमदार निवासातच गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई आहे. कॅन्टीनमध्ये पाणी नसल्यामुळे कागदी प्लेटमध्ये जेवण वाढण्याची वेळ आली आहे. ज्या सरकारला आमदार निवासातील पाण्याचे नियोजन करता येत नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार आहेत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

एकीकडे जनतेला पाण्याचा एक थेंब मिळत नाही, तर दुसरीकडे आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. सत्ताधारी आमदार पाण्यासाठी आता टॉवेलवर जाऊन मारामारी करणार आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

 

राज्याचे जलसंपदा मंत्री नाशिक विधानपरिषदेच्या घोडेबाजारात व्यस्त होते

राज्याचे जलसंपदा मंत्री नाशिक विधानपरिषदेच्या घोडेबाजारात व्यस्त होतें आणि उरलेले मंत्री पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यापेक्षा विरोधकांचे लोकप्रतिनिधी पळविण्यात व्यस्त आहेत. जनतेला राजकारण नको, पाणी हवे आहे. सत्तेचा खेळ थांबवा आणि महाराष्ट्राच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करा अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

यंदाचा उन्हाळा हा महाराष्ट्रासाठी त्रासदायक ठरला आहे. त्यात लांबलेला मान्सून यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मान्सूनचे संकट आहे. या सर्वच मुद्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरील विविध समस्यांवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.