मन-निर्मळ : स्तुती की समाधान?
esakal June 20, 2026 10:45 AM

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

क्टर, मला एक गोष्ट समजत नाही... माझे सासू-सासरे आता वयस्कर आहेत. त्यांची डॉक्टरकडे ने-आण, औषधे, तपासण्या, घरातील कामे, अचानक तब्येत बिघडली तर धावपळ- हे सगळं आम्ही दोघं करतो. त्यांचा दुसरा मुलगा परदेशात आहे. वर्षातून एकदा येतो, अधूनमधून फोन करतो. पण कौतुक मात्र त्याचेच! ‘आमचा मुलगा किती मोठ्या पदावर आहे’, ‘तो आमच्यासाठी किती करतो’... आणि आम्ही जे रोज करतोय त्याची दखलही नाही. असे का वागतात ते?’’ समुपदेशनासाठी आलेली स्त्री अस्वस्थपणे बोलत होती.

मनाची प्रवृत्ती

हा प्रश्‍न अनेक घरांमध्ये ऐकायला मिळतो. तो फक्त सासू-सासऱ्यांचा किंवा वयोवृद्धांच्या सेवेचा नसतो. अनेक पालक, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी, अगदी जोडीदारही असे वागतात. जी व्यक्ती रोज सोबत असते, सतत मदत करत असते, तिचे महत्त्व नकळत कमी केले जाते आणि दूर असलेली किंवा क्वचित भेटणारी व्यक्ती जास्त लक्ष वेधून घेते. यामागे मानवी मनाची एक रंजक प्रवृत्ती काम करत असते. मानसशास्त्रात तिला ‘अव्हेलेबिलिटी बायस’ किंवा ‘सॅलिअन्स इफेक्ट’ (Salience) म्हणतात.

साध्या भाषेत सांगायचे तर, जी गोष्ट दुर्मिळ, नवीन, भावनिक किंवा लक्षवेधी असते ती आपल्या मनात अधिक ठळकपणे राहते. त्याउलट जी गोष्ट रोज अनुभवाला येते, ती कितीही महत्त्वाची असली तरी तिची सवय होते. मग तिचे महत्त्व तिच्या प्रत्यक्ष योगदानावरून नव्हे, तर ती आपल्या लक्षात किती येते यावरून मोजले जाते. वर्षातून एकदा फुलणारे झाड आपल्याला आठवते; पण रोज सावली देणाऱ्या झाडाकडे फारसे लक्ष देत नाही. घरात रोज पाणी येत असेल तर त्याची दखल घेतली जात नाही; पण एक दिवस पाणी गेले की त्याचे महत्त्व जाणवते. मानवी नात्यांमध्येही असेच घडते.

परदेशात राहणारा मुलगा आईवडिलांसाठी एक विशेष घटना असतो. त्याचे फोन, भेटी, परदेशातील आयुष्य, त्याच्याशी जोडलेली प्रतिष्ठा यामुळे तो मनात ठळक राहतो. तर रोज जवळ असणारी व्यक्ती जीवनाचा इतका नैसर्गिक भाग बनते की तिच्या योगदानाची स्वतंत्र नोंद घेतली जात नाही. याचा अर्थ आईवडील कृतघ्न आहेत असा होत नाही. उलट अनेकदा ते ज्यांच्यावर सर्वाधिक अवलंबून असतात त्यांनाच सर्वाधिक गृहित धरतात. ‘ही व्यक्ती उद्याही आपल्यासोबत असेल, गरज पडली तर धावून येईल, आपल्याला सोडून जाणार नाही,’ अशी खात्री त्यांना असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या योगदानाची वेगळी दखल घेण्याची गरजच भासत नाही.

नाराजी वाढते

पण यात ज्याच्यावर जबाबदारी असते त्याच्या मनात वेगळेच प्रश्‍न निर्माण होतात.

‘मी इतके करते पण कुणालाच दिसत नाही’, ‘माझ्या कष्टांची किंमत नाही’, ‘जवळ असण्याची शिक्षा तर मिळत नाही ना?’ हे प्रश्‍न स्वाभाविक आहेत. उदा. ऑक्सिजन- प्राणवायूपेक्षा आपल्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टी फार कमी आहेत. पण दिवसातून किती वेळा आपण प्राणवायूबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो? जवळजवळ कधीच नाही! कारण तो सतत उपलब्ध असतो.

उद्देश

इथे अजून एक महत्त्वाची स्पष्टता आवश्यक आहे. आपण वृद्धांची सेवा करतो किंवा काळजी घेतो, ती नेमकी कशासाठी? सेवा हे दिसणारे वर्तन आहे, पण प्रत्येक वर्तनामागे एक न दिसणारा हेतू असतो. एखादी व्यक्ती ग्लासभर पाणी पिते हे आपल्याला दिसते- पण त्या कृतीमागची तहान दिसत नाही. घशाचा कोरडेपणा किंवा अस्वस्थता हा अंतर्गत अनुभव असतो. तो दिसत नसला तरी तोच त्या वर्तनाचा खरा चालक असतो. हे साधे उदाहरण एक सार्वत्रिक तत्त्व सांगते- ‘प्रत्येक वर्तनामागे एखादी गरज, मूल्य किंवा हेतू कार्यरत असतो.’

वृद्धांची सेवा करतानाही हेच लागू होते. स्वतःला विचारून पाहा- ‘मी हे का करते/ करतो आहे?’ उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. कदाचित माझे संस्कार तसे आहेत, कदाचित कुटुंबाची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे, कदाचित जोडीदारासाठी हे आवश्यक आहे, कदाचित मला नकार देता येत नाही, कदाचित काही आर्थिक, सामाजिक किंवा व्यावहारिक बंधने आहेत... हेतू नेहमी उदात्त किंवा आदर्शच असावा असे नाही- पण तो असतोच.

महत्त्वाचा मुद्दा असा, की आपल्याला अपेक्षित असलेली स्तुती, प्रशंसा किंवा मान्यता मिळेलच असे नाही. पण आपण ज्या हेतूने हे कार्य करत असतो, तो हेतू मात्र अनेकदा दररोज पूर्ण होत असतो. उदा. माझा हेतू मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचा असेल, तर मी तो रोज जगत असते. माझा हेतू कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याचा असेल, तर ती रोज पार पाडत असते. माझा हेतू आर्थिक बंधन असेल, तर त्यासाठी आवश्यक बचत मी रोज करत असते.

स्तुती मिळाली तर आनंद होतोच. पण समाधानाच्या अनुभवासाठी एक सूत्र आहे- ‘आपण ज्या हेतूने काम करतो आहोत, तो हेतू पूर्ण होत आहे याची जाणीव तीव्र करणे.’

मानवी वर्तनाचा मोठा भाग आपली मूल्ये, गरजा आणि हेतूंनी चालवला जातो. पण दैनंदिन धावपळीत आपण हे विसरतो आणि फक्त इतरांच्या प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित करतो. तेव्हा काळजी घेणे ओझे वाटू लागते. त्यातून समाधान नव्हे, तर नाराजी, हिशेब आणि कलह निर्माण होतो.

दृष्टिकोन बदलू शकतो

स्वतःच्या हेतूची जाणीव पुन्हा स्पष्ट झाली की दृष्टिकोन बदलू लागतो. मग सेवा ही केवळ कौतुक मिळवण्याचा प्रयत्न राहत नाही, ती आपल्या मूल्यांसाठी, गरजांसाठी केलेली सुसंगत निवड बनते! तेव्हा एक मूलभूत बदल घडतो. स्तुती मिळाली तर आनंद होतो, पण स्तुती नाही मिळाली तरी तरी मी समाधान निर्माण करण्यास आत्मनिर्भर बनते आणि मग सेवा करण्याचे ओझे हलके वाटते. कारण आपले समाधान इतरांच्या शब्दांवर नाही, तर स्वतःच्या हेतूशी असलेल्या प्रामाणिकतेवर आधारलेले असते.

कौतुकाने क्षणिक आनंद मिळतो, पण आपण आपल्या हेतूंनुसार जगतो आहोत ही जाणीव दीर्घकाळ टिकणारे समाधान देते.

रोज जवळ असणाऱ्या व्यक्तीच्या आपल्याप्रती असलेल्या योगदानाची स्वतंत्र नोंद घ्यावीशी वाटत नाही. दूर असणाऱ्या व्यक्तीची मात्र आपल्याला प्रत्यक्ष मदत होत नसली, तरी तिचे कौतुक अधिक वाटते...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.