शिक्षण आयुक्तांचे आदेश! शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी अधिकारी देणार शाळांना अचानक भेटी; दर आठवड्याला ४ शाळांना भेटी देण्याचे बंधन, वाचा...
esakal June 20, 2026 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शालेय शिक्षण विभागातील राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना आता दर आठवड्याला चार शाळांना अचानक भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान शिक्षकांची उपस्थिती, अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, स्वच्छता, पोषण आहार तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध बाबींची तपासणी केली जाणार आहे. शाळेच्या वेळेत शिक्षक गैरहजर आढळल्यास त्यांच्यावर बिनपगारी अथवा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी दरवर्षी शाळांची वार्षिक तपासणी, विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा तसेच चौकशीच्या निमित्ताने भेटी देत असतात. मात्र, गतवर्षी अनेक अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्तांनी नव्याने आदेश जारी केले आहेत.

नवीन आदेशानुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत किमान दोन शाळांना भेट द्यावी लागणार आहे. विभागीय व जिल्हास्तरीय शिक्षणाधिकाऱ्यांना दर आठवड्याला दोन शाळांना, तर गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांना आठवड्यातून तीन शाळांना भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय पोषण आहार अधीक्षक, विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुखांना दर आठवड्याला किमान चार शाळांची तपासणी करावी लागणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ७६५ शाळा असून, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे दीड हजार शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये नियमित तपासणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांना भेटीदरम्यान आढळलेल्या बाबींचा अहवाल आणि छायाचित्रे ‘सरल’ पोर्टलवरील विशेष लिंकवर अपलोड करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

...तर शिक्षकांवर कठोर कारवाई

शालेय शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना शाळांना अचानक भेटी द्याव्या लागणार आहेत. या भेटीदरम्यान शिक्षकांच्या उपस्थितीसह १२ महत्त्वाच्या मुद्द्यांची तपासणी केली जाईल. तपासणीचा अहवाल ‘सरल’ पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळेच्या वेळेत शिक्षक गैरहजर आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘या’ बाबींची होणार तपासणी

  • शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती

  • शाळा परिसर व विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता

  • वर्गावरील तासिकेचे निरीक्षण (किमान एका वर्गावरील एक तासिका)

  • विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन

  • ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाची अंमलबजावणी

  • विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांची तयारी

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना

  • शैक्षणिक साहित्य, किट, प्रयोगशाळा व त्यांचा वापर

  • डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी

  • पीएम पोषण योजनेअंतर्गत आहाराची गुणवत्ता, स्वच्छता व मेनूनुसार अंमलबजावणी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.