संत नामदेव महाराज : तेणें सर्व काज साधेल तुमचें
esakal June 20, 2026 10:45 AM

सचिन महाराज पवार

कोणत्याही समूहाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यामागे स्पष्ट दिशा, योग्य नियोजन आणि प्रेरणादायी नेतृत्व असणे आवश्यक असते. एखाद्या संस्थेचा, संघटनेचा किंवा चळवळीचा नेता केवळ आदेश देणारा नसून, तो मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा असावा लागतो. संत नामदेव महाराजांनी या अभंगातून श्रीकृष्णाच्या नेतृत्वगुणांचे अत्यंत हृद्य चित्र उभे केले आहे. कृष्ण गोपाळांना फक्त काम सांगत नाही, तर ते काम कसे करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, याचेही सूक्ष्म मार्गदर्शन करतो.

देव सांगे तुम्ही सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणोनियां ॥१

तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥

कृष्ण सांगतो की प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने ठेवली, तर कार्य सहज सिद्ध होते. हा केवळ व्यवहाराचा नियम नाही, तर समूहजीवनाचा पाया आहे. आज अनेक उत्तम कल्पना नियोजनाच्या अभावामुळे अपूर्ण राहतात. प्रत्येकाने आपली भूमिका समजून घेतली आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर कठीण वाटणारे ध्येयही सहज गाठता येते. यालाच समन्वयाची शक्ती म्हणतात.

घ्यारे आतां वरी मृत्तिका गाळुनी । सराटे वेंचुनी वोंटीं भरा ॥३

या ओळीत कृष्ण प्रत्येकाला वेगवेगळे काम सोपवतो. कोणाला माती आणायची, कोणाला आवश्यक साहित्य गोळा करायचे. येथे कार्यविभाजनाचा सुंदर आदर्श दिसतो. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता आणि कौशल्यानुसार जबाबदारी दिली, तर समूह अधिक सक्षम बनतो. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ज्याला ‘टीमवर्क’ म्हणतात, त्याचे हे सहज आणि सुंदर उदाहरण आहे.

डांगा एक आणा वेंचुनीयां खडे । निघावें रोकडे एकसरा ॥४॥

मोठी कामे एखाद्या एका व्यक्तीच्या सामर्थ्यावर उभी राहत नाहीत; ती अनेक छोट्या प्रयत्नांच्या एकत्रित बळातून साकार होतात. समाजकार्य असो, उद्योग असो, विद्यार्थी चळवळ असो किंवा कुटुंबव्यवस्था... प्रत्येकाने आपला वाटा उचलला, तरच सामूहिक ध्येय वास्तवात उतरते. एकजुटीचे सामर्थ्य हेच यशाचे खरे रहस्य आहे.

नामा म्हणे ऐसें ऐकतां गोपाळ । नाचती सकळ कृष्णापुढें ॥५॥

अभंगाच्या शेवटी गोपाळ कृष्णाचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारतात. त्यांच्या मनात भीती नसते, तर विश्वास आणि प्रेम असते. खरा नेता अधिकाराने नव्हे, तर आपुलकीने मने जिंकतो. तो लोकांवर सत्ता गाजवत नाही; त्यांच्या अंतःकरणात प्रेरणा जागवतो. ज्या नेतृत्वात स्पष्ट दृष्टी, योग्य नियोजन, कार्यविभाजन, परस्पर विश्वास आणि प्रेमळ सहभाग असतो, त्या नेतृत्वामागे लोक स्वयंस्फूर्तीने उभे राहतात.

म्हणूनच यशस्वी समूहकार्याचा पाया हा केवळ कौशल्यात नसून, समन्वय, विश्वास आणि प्रेरणादायी नेतृत्वात असतो. संत नामदेव महाराजांचा हा अभंग आजही सांगतो की, योग्य दिशा, योग्य नियोजन आणि एकजुटीने प्रयत्न केले, तर- तेणें सर्व काज साधेल तुमचें.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.