मोकळे व्हा : नव्या नात्यांची नवी आव्हाने
esakal June 20, 2026 11:45 AM
डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : दोन वर्षांपूर्वी मला न्यायालयातून घटस्फोट मिळाला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मी पुनर्विवाह केला. माझ्या पत्नीच्या पहिल्या पतीचे अपघातात निधन झाले होते. पहिल्या विवाहापासून तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. मी पत्नीसह तिच्या मुलाचाही मनापासून स्वीकार केला आहे आणि त्याचे संगोपन माझ्या मुलाप्रमाणेच करत आहे. आता त्याला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. त्याच्या जन्मदाखल्यावर त्याच्या पहिल्या वडिलांचे नाव आहे. मी त्याचा पालक म्हणून माझे नाव शाळेच्या नोंदीमध्ये लावू शकतो का? त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल का?

उत्तर : प्रथम तुमच्या निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. एखाद्या स्त्रीचा तिच्या मुलासह स्वीकार करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेणे ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार भूमिका आहे. मात्र भावनिक स्वीकार आणि कायदेशीर पालकत्व या दोन वेगळ्या बाबी आहेत. केवळ पुनर्विवाह झाल्यामुळे मुलाच्या जन्मदाखल्यावरील वडिलांचे नाव बदलता येत नाही. तुम्हाला त्या मुलाला कायदेशीररित्या दत्तक घ्यावे लागेल. विद्यमान कायदेशीर प्रक्रियेनुसार व ‘कारा’च्या (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ऑनलाइन नोंदणी करून दत्तक प्रक्रियेची सुरुवात करावी लागते. कागदपत्रांची पडताळणी, संबंधित प्राधिकरणाची ‘ना हरकत’ (एनओसी) आणि इतर पूर्तता झाल्यानंतर न्यायालयाकडून दत्तक आदेश (ॲडॉप्शन ऑर्डर) प्राप्त होतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही मुलाचे कायदेशीर वडील म्हणून मान्यता मिळवू शकता. नंतर संबंधित कायदेशीर नोंदींमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याची प्रक्रिया करता येते. दत्तक प्रक्रियेचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ‘कारा’च्या अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची आणि कायदेशीर तरतुदींची खात्री करून घेणे उचित ठरेल.

तोपर्यंत शाळेत प्रवेशासाठी जन्मदाखल्यावरील ‘जैविक वडिलांचे नाव’च ग्राह्य धरले जाईल. काही शाळांमध्ये सावत्र वडील किंवा स्थानिक पालक म्हणून नोंद करण्याची सुविधाही उपलब्ध असते. याबाबत संबंधित शाळेची नियमावली तपासून घ्यावी.

एखाद्या मुलासाठी केवळ नावापेक्षा प्रेम, सुरक्षितता, स्वीकार आणि जिव्हाळा अधिक महत्त्वाचा असतो. तुम्ही त्याला ते देत आहात, हीच त्याच्या आयुष्यातील सर्वांत जमेची बाजू आहे. आता योग्य प्रक्रिया पूर्ण करून त्याला कायदेशीर संरक्षण आणि सुरक्षित भविष्य मिळवून देणे हे पुढचे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

प्रश्‍न : माझा पुनर्विवाह होऊन दोन वर्षे झाली. पत्नीचाही हा दुसरा विवाह आहे. पत्नीने तिच्या पहिल्या विवाहात पतीकडून त्रास होत असल्यामुळे घटस्फोट घेतल्याचे मला सांगितले होते. मात्र आमच्या लग्नानंतर तिचा स्वभाव हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागला. ती अत्यंत हट्टी आहे, स्वतःचेच मत योग्य असल्याचा आग्रह धरते आणि प्रत्येक निर्णयात तिच्या आई-वडिलांचा मोठा प्रभाव असतो.

ती वारंवार माहेरी जाते, आई-वडिलांना आर्थिक मदत करते आणि आमच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये त्यांचा हस्तक्षेप असतो. आमच्यात किरकोळ वाद झाला तरी ती आमच्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी निघून जाते. तिचे आई-वडील तिला समजावून सांगण्याऐवजी पाठिंबा देतात, त्यामुळे मला माझ्या मुलीला भेटता येत नाही.

अलीकडे मी तिच्या पहिल्या विवाहाबाबत माहिती घेतली. तिथेही अशाच कारणांमुळे तिचे वारंवार वाद होत होते असे समजले. यामुळे मी खूप गोंधळून गेलो आहे. पत्नीला संसाराचे महत्त्व कसे समजावून सांगावे? तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप कसा कमी करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.

उत्तर: तुमच्या प्रश्‍नावरून असे दिसते की येथे केवळ पती-पत्नीमधील मतभेद हा प्रश्‍न नसून वागण्याच्या सीमा (बाउंड्रीज) आणि मूळच्या कुटुंबाचा वैवाहिक नात्यावर होणारा प्रभाव हा मुख्य मुद्दा आहे.

विवाहानंतर आई-वडिलांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे चुकीचे नाही; परंतु प्रत्येक मतभेदात माहेरचा हस्तक्षेप वाढू लागला तर पती-पत्नीचे नाते कमकुवत होण्याची शक्यता असते. संसारातील निर्णय शक्यतो पती-पत्नीने परस्पर संवादातून घेणे आवश्यक असते.

तुमच्या पत्नीच्या पहिल्या वैवाहिक आयुष्यातही अशाच प्रकारच्या अडचणी आल्या असतील, तर त्याबाबत दोषारोप करण्याऐवजी त्याकडे वर्तनातील पुनरावृत्ती (बिहेव्हियर पॅटर्न) म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. काही व्यक्तींना मतभेद सोडवण्याऐवजी नात्यापासून दूर जाण्याची सवय लागलेली असते. अशी सवय बदलण्यासाठी स्वतःमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी आवश्यक असते.

तुम्ही पत्नीशी बोलताना तिच्या आई-वडिलांबद्दल टीका करण्याऐवजी, ‘आपल्या मुलीसाठी आणि आपल्या नात्यासाठी आपण दोघांनी मिळून निर्णय घेणे आवश्यक आहे,’ या भूमिकेतून संवाद साधा. दोष देणारा संवाद वाद वाढवतो, तर नात्याला केंद्रस्थानी ठेवणारा संवाद बदलाची शक्यता निर्माण करतो.

मुलीला एका पालकापासून दूर ठेवणे हा कोणत्याही मतभेदात योग्य मार्ग नाही. पती-पत्नीमधील वादांचा परिणाम मुलांच्या भावनिक विकासावर होऊ शकतो. त्यामुळे दोघांनी मुलीच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक विवाहात मतभेद असतात; परंतु वारंवार माहेरी जाणे, संवाद टाळणे आणि बाहेरील व्यक्तींना निर्णयांमध्ये प्रमुख स्थान देणे, यांमुळे प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचे होतात. तुमच्या पत्नीला तुमच्याबद्दल विश्‍वास वाटेल असे वातावरण तयार करा. नाते टिकवायचे असेल तर दोघांनी परस्पर विश्‍वास, संवाद आणि वैवाहिक नात्याच्या मर्यादा यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. संसार यशस्वी होण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते; परिपक्वता, जबाबदारी आणि एकमेकांप्रती बांधिलकीही तितकीच आवश्यक असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.