संत एकनाथ महाराज : येणे परमार्थचि साधावा
esakal June 20, 2026 12:45 PM

योगिराज महाराज पैठणकर

श्रीसंत एकनाथ महाराज हे समन्वयवादी संत म्हणून ओळखले जातात. आपल्या सहासष्ट वर्षांच्या व्यावहारिक जीवनात असे अनेक प्रसंग आले, ज्या वेळी त्यांनी समन्वयाची भूमिका बजावणे गरजेचे होते आणि त्यांनी ती लीलया पार पाडली देखील.

प्रपंच-परमार्थ असो, वा खासगी-सार्वजनिक आयुष्य असो. वंश परंपरेचा वारकरी संप्रदाय असो, वा गुरुपरंपरेने प्राप्त दत्त संप्रदाय असो. अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी या सगळ्याचा सुवर्णमध्य साधला आहे. असं क्वचितच घडतं. ‘संसार सोडून केवळ परमार्थ करा’ व ‘परमार्थ सोडून केवळ प्रपंच करा’- या दोन्हींमधील अंतर कमी करून हेही व्हावं आणि तेही व्हावं हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आग्रह आहे.

हा नरदेहच असा आहे, की ज्याद्वारा परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संसार करणेच आहे. अर्थात संसार म्हणजे विवाहानंतरचं आयुष्य नव्हे, तर जन्माला आल्यानंतर पार पडणारी क्रिया होय. त्यामुळे नरदेह ना त्यागायचा ना भोगायचा!

देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हरवावा ।

वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तै नेईल रौरवा निश्चित ।। अ. २१

देह सांडावा न मांडावा । येणे परमार्थचि साधावा

निंद्य म्हणून या देहाचा त्याग नको आणि वंद्य समजून विनाकारण कोडकौतुक नको. तर त्याने परमार्थाचे साधन करीत आपले जीवन व्यतीत करावे. भोगी माणसं विषयाभिलाषेने लिप्त होतात तर योगी भगवदाभिलाषेने सर्वस्वाचा त्याग करतात. हे दोन्हीही प्रकार टोकाचे आहेत. याचा मध्य साधणाऱ्यांचाच प्रपंच-परमार्थ एकरूप होऊ शकतो.

जीवनाच्या वाटेवर अनेक चढउतार येत असतात. सुखदुःखाचे अनेक प्रसंग घडतात. कधी समाधान तर कधी चिंता. परंतु अशाही स्थितीत स्थितप्रज्ञतेची अवस्था संतांकडे पहावयास मिळते. ते सुखामुळे हुरळून जात नाहीत व दुःखाने खचून जात नाहीत. तीतिक्षा हा एक महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे असतो. तीतिक्षा म्हणजे प्रारब्धप्राप्त दुःखे कष्टावाचून सहन करणे होय. आपल्याकडून नेमके हेच होत नाही. सैन्यदलात, पोलिस दलात प्रवेश करण्यापूर्वी अशा अनेक परीक्षा द्याव्या लागतात. तेव्हाच तो तावून सुलाखून निघतो व कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम होतो. तशीच भूमिका प्रत्येक प्रापंचिकाची, गृहस्थजीवनाचा अनुभव घेणाऱ्याची असणे अपेक्षित असते. त्यामुळे संत हे द्वंद्व दुःखाचा नाश व्हावा म्हणून आपल्याला नामाचा उपदेश करतात. आपलं जीवन एका ध्येयाच्या दिशेने जात असेल तर ते ध्येय अध्यात्माच्या बैसकेवर असावे, तेव्हाच जीवन योग्य दिशेने प्रवास करत आहे असे म्हणता येईल. व्यवहार करू नका असे एकनाथ महाराज म्हणत नाहीत. मात्र देवाचं नाव, भजनाबद्दल प्रेम बाळगणे गरजेचे आहे असे ते सांगतात.

सारे दिन करा संसाराचा हेत । परी भजनी प्रीत असो द्यावी ।।

अशी अवस्था प्राप्त होणे म्हणजेच जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होणे आहे. आम्ही प्रपंच आणि परमार्थ या दोघांचाही त्याग करू शकत नसू, तर त्या दोघांचा सुवर्णमध्य साधावा. सद्य परिस्थितीत संसार आणि परमार्थाची एकरूपता आपल्याला कुठे दिसत असेल, तर ती श्रीसंत एकनाथ महाराजांच्या जीवनात. म्हणून प्रत्येक गृहस्थाचा आदर्श संत एकनाथ महाराज आणि आईसाहेब गिरीजाबाई हे असावेत- जेणेकरून ‘परमार्थ संसार एकरूप’ होऊ शकतो. यासाठी एकनाथ महाराजांचे चरित्र मुळातून अभ्यासणे गरजेचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.