नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची रक्कम जारी करणार आहेत. या हप्त्याची रक्कम देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पीएम किसानच्या 23 व्या हप्त्यामध्ये 18,880 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या हुगळी येथून एका कार्यक्रमातून पावणे चार वाजता ही रक्कम वितरीत करतील.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पश्चिम बंगालच्या 45.35 लाख शेतकऱ्यांना 907 कोटी रुपये मिळतील. पीएम किसानमधून पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम 15,055 कोटी रुपये होईल. तर, ही योजना सुरु झाल्यापासून देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम 4.46 लाख कोटी रुपये होईल.
शिवराज सिंह चौहान यांच्या माहितीनुसार पीएम किसानची रक्कम डीबीटी मार्फत पाठवली जाते. याशिवाय नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमईबीवाई) आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजना (आरडब्ल्यूबीसीआईएस) ची सुरुवात करतील. या योजनेचं बजेट 12,200 कोटी रुपये आहे.
देशातील 9.44 कोटी शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळतील. केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18880 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जाईल.
पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पीएम किसानच्या पोर्टलवर ओटीपीआधारित ई केवायसी सुविधा सुरु आहे. याशिवाय जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करुन घेणं आवश्यक आहे. ई केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरु ठेवण्यासाठी ई – केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो?
महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 90 लाख 95 हजार 39 इतकी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती देखील मिळते.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान सनन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्राकडून दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचं अंतर ठेवलं जातं.