पाऊस अजून पडलेला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आणि आपल्याकडं काय सुरुय? पैसा देऊन खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे, लोकांनीच आता विचार केला पाहिजे; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप
परशराम पाटील, एबीपी माझा June 20, 2026 07:43 PM

Raj Thackeray: आपल्याकडे अजून पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार, अशी स्थिती असताना आमच्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे सुरु आहे. आमची सत्ता कशी टिकेल, त्यासाठी वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार, पाच तास उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिला तो माणूस 50-100 कोटींसाठी म्हणून विकले जातात, त्यावर एक जुन वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उठतात फक्त जिवंत प्रेतं, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्ला चढवला. भाजपमध्ये सुद्धा आतून पेटलं असून ज्वालामुखी झाला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे, पण ते करताना हातामध्ये सत्ता आणि 20 वर्षांपूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात जमीन अस्मानचा फरक असल्याचे ते म्हणाले. 

खोट्या मतदारांवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे

राज ठाकरे म्हणाले, निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवर आली आहे की, यांच्याकडे दुर्लक्ष करण्यामुळे आपण आयुष्यातील पाच पाच वर्ष घालवतोय. सत्तेचा मार्ग हा मतदारयादीत जातो. खरा मतदार कोण आहे खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. जनगणना सुरू होत आहे. हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. गप्पा मारता मारता बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाही, नोंद करून ठेवतात आणि ज्यावेळी हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

त्यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला अस वाटत हे पण तुम्ही तपासण गरजेचं आहे. भावनिक सगळे विषय काढायचे आणि ह्यांचं काम हे वेगळ्याने चालू असतं, तुम्हाला इकडे बघायला लावतात आणि ह्यांच काम चालू असत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी आज बेरोजगारीचं प्रमाण इतक प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे की आपलं लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या करतात, विद्यार्थी आत्महत्या करतात, नीटचे (NEET) पेपर फुटतात, लहान मुलं पळवली जातात, मुली पळवल्या जातायत त्याचे व्यापार होत आहेत, असे ते म्हणाले. 

लाडकी बहिण योजनेवरून टीका

राज यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजना आणली तेव्हा मी सांगत होतो महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्या. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाही. फुकटची गोष्ट दिल्यावर राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. तुमच्या मतांसाठी ज्या फुकट गोष्टी करायला लागतात त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढावे लागतात. तुम्हाला एक रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, अशी टीका त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.