बेस्ट संप सुरुच, सहभागी कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस,नीट परीक्षा केंद्रांवर एसटी बसेसची सोय
Tv9 Marathi June 21, 2026 12:45 AM

मुंबईत गुरुवारी रात्री पासून बेस्टचा संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन दिवस झाले तरी या संपावर तोडगा निघालेला नाही, रविवारी नीटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या या संपाच्या पार्श्वभूमीवर एकंदरच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने एसटीच्या बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (MESMA) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. वेट लीज कंत्राटदारांनाही MESMA अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

मुंबईत बेस्टच्या संप सुरु होऊन दोन दिवस झाले तरी तोडगा न निघाल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. त्यात टॅक्सी चालकांनी मुंबईत लुटमार सुरु केल्याने प्रवासी नाडले गेले आहेत. रविवारी नीटची परीक्षा असल्याने बेस्ट प्रशासनाला अखेर जाग आली आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) 100 बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईतील 63 NEET परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी अतिरिक्त 60 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस सकाळी 9 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत चालवण्याचे आदेश डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, बेस्टच्या वीज पुरवठा विभागावर या संपाचा कोणताही परिणाम झालेला नसून अत्यावश्यक वीज सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून संपाचा परिणाम कमी करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे बेस्ट प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.