Gigi Scaria Art : माती, पुस्तके आणि कुतूहलातून घडलेले जीजी स्कारियांचे कलाविश्व
esakal June 21, 2026 10:45 AM

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

जीजी स्कारिया यांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या आहेत. केरळमध्येजन्म घेतलेल्या स्कारिया यांनी गुजरात व दिल्ली या राज्यातही काम केले आहे. शालेय पुस्तकांसाठी चित्रे तयार करण्याचेही काम त्यांनी केले. सामाजिक उतरंडीबद्दल जागरूक असलेल्या या कलावंताने वेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती घेऊन त्यातून चित्रे साकारली.

जीजी स्कारिया यांच्या कौटुंबिक घरामागे अजूनही आगगाडीचे रूळ आहेत. ‘आमच्या घरामागे रेल्वेचे रूळ आहेत. दोन्ही बाजूंना रस्ते आहेत आणि समोरच दुकाने आहेत. ते एक जंक्शन आहे,’ असे जीजी सांगतात. ज्या कलावंताने सतत स्थलांतर, स्थित्यंतर आणि निरनिराळ्या परिस्थितीतून जाण्याच्या अनुभवाबद्दलचे विचार मांडले आहेत, त्यांच्याशी हे चित्र जुळते. जीजी स्कारिया कोथनाल्लूर ह्या एका कोट्टायम जवळच्या खेड्यात वाढले. येथील बहुतेक वस्ती ही ख्रिश्चन लोकांची होती. बालपणापासून चर्च, देऊळ आणि धार्मिक कर्मकांड आणि इतिहासातील कथा यांच्या भोवती फेर धरून होत्या. तरुण स्कारिया याला मात्र यामागील धर्म कल्पनेपेक्षा अधिक रस होता प्रतिमांचा.

‘येशू ख्रिस्ताने क्रुसावर चढणे हे मला सतत दिसायचे, येशूचे पिळदार शरीर, त्याची बांधणी, त्याचे स्नायू आणि शिल्पात ते जसे दिसायचे तसे.’

ते घरी आले की जवळच्या शेतातील माती गोळा करून मातीच्या आकृती तयार करायचे. त्यांच्या घरी कोणालाही कलेची पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील व्यवसाय करण्याची अयशस्वी धडपड करत असत. संसारात स्थिरता नव्हती तरी त्यांना आजी उत्तेजन देत असे. त्याचे मन रिजवायला त्या स्वतः काही आकृत्या तयार करत असत.

Art Inspiration: नक्कल नको, स्वतःचा 'आवाज' शोधा! चित्रकार मनीषा पारेख यांचा प्रेरणादायी कलाप्रवास; वारसा असूनही कष्टाने सिद्ध केले वेगळेपण पुस्तके, माती आणि एकान्त

शाळेत जाण्याआधीपासूनच जीजी यांनी स्वतःचे असे पुस्तकांचे आणि चित्रांचे विश्व निर्माण केले होते. तेथील स्थायिक सार्वजनिक वाचनालय हे जणू त्याचे दुसरे घरच बनले होते. ‘सतराअठरा वर्षाचा होईतो माझे बहुतेक अभिजात साहित्य वाचून झाले होते.’ मल्याळी भाषेतले अनुवाद. यामुळे अनेक दारे उघडली गेली. रशियन कादंबऱ्या गॅब्रियल गार्सिया, मारकुएज, मल्याळीतील श्रेष्ठ लेखक थकाजी शिवशंकर पिल्लई यांची ‘कायर’ - या सर्वांचा त्यांच्या मनात एकाचवेळी प्रवेश झाला. त्यांचे ऐकता ऐकता लक्षात येते, की स्कारिया यांचे कलाविश्व हे कधीच फक्त एक कलाप्रकरासाठी मर्यादित नव्हते. साहित्य, सिनेमा, राजकारण, इतिहास या सर्वांचा त्यांचा विचारविश्वात समन्वय आहे. अनेकविध विषयासंबंधीचे कुतूहल हे नंतरच्या काळात त्यांच्या कामाचे केंद्रबिंदू ठरणार होते.

आर्ट स्कूल आणि रॅडिकल विचारप्रवाह

तिरुअनंतपूरम येथील कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स मध्ये १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते दाखल झाले, तेव्हा एका फार वेगळ्या अशा कलाविश्वाशी त्यांचा परिचय झाला. के.पी. कृष्णकुमार सारखे मूलगामी विचार करणारे पेंटर आणि शिल्पकार अशा परिवर्तनवादी कलाकारांचा वैचारिक प्रभाव अजून जाणवत होता. ‘एकूण तेथील वातावरण हे ध्येयवादाने भारलेले होते. कलाही फक्त कलेसाठी नव्हती.’ येथील ज्येष्ठ विद्यार्थी हे सारा वेळ राजकारण, तत्त्वज्ञान आणि कलेचे प्रयोजन अशा विषयांची चर्चा करत असत. नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांपुढे सतत आव्हान उभे करायचे. ते सतत टोकायचे, ‘तुम्ही करता ते सारे निरर्थक आहे.’ काही विद्यार्थी या टीकेमुळे निष्क्रिय व्हायचे तर स्कारिया सारखे काही अधिक कार्यक्षम होत असत. ‘आम्ही काम करत राहू असे आम्ही ठरवलं.’ त्या वेळेचे राजकीय वातावरण समजून घेत त्यांनी शून्यवादापासून स्वत:ला दूर ठेवले. उलट नेटाने पेंटिंग करत राहिले आणि ते करताना काही वेळा ते स्वभावत: प्रवाहाविरुद्धही वागत. त्याचवेळी कॉलेजबाहेरील जगात काही वेगळे संस्कार वाट पाहत होते. तिरुअनंतपूरम येथील फिल्म सोसायटी अत्यंत उत्साहाने काम करत होती. जवळ जवळ रोज जागतिक दर्जाचे चित्रपट पाहायला मिळत असत आणि त्यावर हिरिरीने चर्चा होत असे. ‘कलेला तात्कालिक परिस्थितीशी भिडलं पाहिजे, असं गृहीत धरलं जाई.’

दिल्ली शहराची विवंचना

शिक्षण संपल्यानंतर आपल्याला केरळ सोडून जावे लागेल याची जाणीव त्यांना होती. ‘मला बाहेर पडायचंच होतं,’ ते म्हणाले. ते आधी बडोद्याला गेले कॉलेज शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी. अखेरीस ते दिल्लीला आले, तिथे मंडी हाऊस जवळील स्वस्त वसतिगृहात राहू लागले. काही दिवसांनंतर मदनगीरमध्ये ते खोली घेऊ शकले. त्या १९९० च्या दशकात दिल्लीला येणाऱ्या अनेक कलावंतांसाठी कसेतरी जगणे हेच महत्त्वाचे ठरले. त्यांनी व्यावसायिक आर्ट स्टुडिओत काम पत्करून शालेय पुस्तकांसाठी चित्रे तयार करण्याचे काम केले. ‘हे काम दिवसभर चालायचे.’

केरळात ते अनेक गोष्टी शिकले होते परंतु शहरातील जीवघेण्या असमानतेशी त्यांचा परिचय झाला नव्हता. ‘अचानक शहराकडे तुम्ही वेगळ्या नजरेने पाहू लागता. वर्गभेद जाणवत, स्थलांतरित लोक, रिक्षा चालवणारे हे सगळे एकत्र राहत.’ ते शहर त्याच्या कल्पनेत सत्य आणि रूपकाच्या स्वरूपात सामावून गेले. त्यांनी मास्टर इन फाइन आर्ट्समध्ये जामिया मिलिया मध्ये पूर्ण केले. या प्रश्नांनी ते अधिकच बेजार होऊ लागले. नकाशे, शहरी घरे आणि स्थलांतरित विषय त्यांच्या कामात परत परत दिसू लागले. ‘नकाशे हे दुरून अमूर्त वाटतात परंतु प्रत्येक ओळ किंवा बिंदू हा अर्थपूर्ण असतो. हे माझ्या लक्षात आलं.’ ही जाणीव त्यांच्या कलाविश्वाला केंद्रिभूत ठरली. त्यांच्या कलाकृतीतील शहरे फक्त भौगोलिक जागा व्यापत नाहीत. त्यांना मानसिक अर्थ आहे. त्यात सामाजिक उतरंड आणि अदृश्य शक्तीकडील नियंत्रण यांचे चिंतामय दर्शन त्यात घडते.

विवान सुंदरम आणि सहविचार

विवान सुंदरम हे कलावंत जामिया मिलियात शिकवायला येऊ लागले, तेव्हा एक मोठा बदल झाला. विद्यार्थ्यांना सुंदरम हे पारंपरिक स्टुडिओ पद्धती बाहेर जाऊन सहकार्याने संशोधनपर विचार करायला उद्युक्त करायचे. एका कामासाठी स्कारिया यांनी एक खड्डा तयार केला. ज्यात इतर सहकाऱ्यांनी केलेल्या मातीच्या मूर्ती रचण्यात आल्या. हडप्पा, मोहेंजोदडो आणि इतर उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून ही कल्पना त्यांना सुचली होती. त्यामुळेच स्कारिया कलेसंबंधी वेगळ्या तऱ्हेने विचार करू लागले हे अधिक महत्त्वाचे. कला ही खरी वेगळी पाहायची नसते तर ती एक बहुआयामी सामाजिक कृती असते. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांचा ‘खोज’ या कलाकारांनीच सुरू केलेल्या संस्थेशी संबंध आला. ‘खोज’ ही एक पर्यायी व्यवस्था होती. तिथे निरनिराळे प्रयोग करणे शक्य होते.’ प्रयोगक्षमता ही स्कारियांच्या कामाच्या दृष्टीने बहुमोल ठरली.

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा संघर्षाचा दीर्घकाळ

त्यांच्या पिढीतील बहुतेक कलावंताप्रमाणे स्कारिया यांनाही सुरुवातीची वर्षे काम आणि गुजराण दोन्ही सांभाळण्याची सर्कस करावी लागली.

त्यांनी एका शाळेत ड्रॉइंग मास्तर म्हणून नोकरी केली. बालवाङ्मयासाठी चित्रे काढून दिली. वसंत कुंज मधील एका आर्ट स्कूलमध्ये सायंकाळी शिकवू लागले. याच काळात त्यांनी प्रेरणा या आपल्या सहकलाकाराशी विवाह केला. इनलॅक्स या प्रतिष्ठित संस्थेची अभ्यासवृत्ती मिळाल्यामुळे ते इटलीच्या पिस्टोलेट्टो फाउंडेशनच्या रेसिडेन्सीमध्ये २००२ मध्ये जाऊन आले तरीही आर्थिक स्थैर्य मिळाले नाही. इटलीतील अनुभवामुळे त्यांच्यात बदल मात्र बराच झाला. तेथील संगीतकार, स्थापत्यकार, तत्त्वज्ञ आणि कलावंत यांच्या संगतीत ते स्वतः व्हिडिओ आर्ट आणि इन्स्टॉलेशन यांच्याकडे वळू लागले. ‘कलाकृती तयार करणे यापेक्षा कल्पकतेला फुलोरा देणे महत्त्वाचे होते.’ जवळजवळ पाच वर्षे त्यांनी पेंटिंग सोडूनच दिले.

सारेच बदलले २००५ साली त्यांचे ‘एब्सेंस ऑफ ॲन आर्किटेक्ट’ हे सोलो प्रदर्शन दिल्लीच्या पॅलेट आर्ट गॅलरीत भरले. त्यानंतर स्कारिया यांच्या कामातला हा महत्त्वाचा टप्पा ठरला. या प्रदर्शनात व्हिडिओ, छायाचित्रे आणि पेंटिंग्ज यांमधून दिल्ली शहरातील विसंगतींवर बोट ठेवले होते.

‘शहराचे बहुविध स्वरूप दिसत होते’

या प्रदर्शनानंतर जीजी स्कारिया यांचे आजच्या कलाविश्वात स्थान मानाचे ठरले. त्यानंतरही त्यांच्या हातून काही महत्त्वाच्या कलाकृती स्वतंत्रपणे गॅलरीपद्धती बाहेर झाल्या. एका प्रकल्पात, दिल्लीच्या रात्री भंगाराने लादलेल्या सायकलवरून फिरणाऱ्या दोन तरुण कचरा वेचणाऱ्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘रेज युअर हँड दोज हू हॅव टच हिम’ या नावाच्या प्रकल्पात जी ज्येष्ठ मंडळी महात्मा गांधींना प्रत्यक्ष भेटली होती, त्यांच्या मुलाखती होत्या. अनेक महिने स्कारिया दिल्ली शहरभर खासगी मुलाखती घेत हिंडत होते. ‘मी ऐतिहासिक दस्तऐवज शोधत नव्हतो तर व्यक्तिगत सर्वसाधारण आठवणी गोळा करत होतो.’ या उद्योगामुळे दस्तऐवजही तयार झाला आणि विचारांना खाद्यही मिळाले - आठवणी हे इतिहासातील विस्मरण आणि राष्ट्रपुरुषाच्या वैयक्तिक नातेसंबंधाची नोंद असते. सर्वांत महत्त्वाचे इन्स्टॉलेशन ‘एलिव्हेटर फ्रॉम द सबकॉन्टिनेन्ट’ हे वेनीस बिएनाल २०११च्या भारतीय विभागात दाखवले गेले.

भारतीय समाजाच्या निरनिराळ्या थरातून उतरंड दाखवणारा आभासी लिफ्टचा वरखाली प्रवास पाहणाऱ्यांना करावा लागायचा. खालच्या पातळीवर दाटीवाटीने राहणारे गरीब लोक तर वरच्या मजल्यावर आलिशान महाल अशी आपली सामाजिक उतरंड. ‘‘ते सामाजिक उतरंडीबद्दल होते,’’ त्यांनी स्पष्ट केले. ‘‘समाज स्वतःकडे नेहमीच अशा उच्च-नीचतेच्या उभ्या रचनेत पाहतो याबद्दल ते होते.’’ आज स्कारिया यांचे भारतीय कलाविश्वातील स्थान पक्के आहे. त्यांच्या कलाकृती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचल्या आहेत. त्यांचे वढेरा आर्ट गॅलरीतील आगामी प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यांच्या कामाचे स्वरूप प्रतीकात्मक वा काव्यात्मक असले, तरी त्यात बाह्यविश्व असतेच असते. त्यामुळे त्यांचे काम पाहणाऱ्याला का भिडते ते लक्षात येते. कारण इन्स्टॉलेशन्स, नकाशे, एलेवेटर आणि शहरी देखावे यांमागे एक थेट प्रश्न परत परत विचारला जातो. जी समाजव्यवस्था सातत्याने माणसांना चळवळी, फक्त आकडेवारी आणि निव्वळ जिवंत राहण्याच्या पातळीवर आणते. त्यात माणुसकी कशी जिवंत ठेवायची?

View this post on Instagram