सीटल ः सहयजमान अमेरिकेने लागोपाठ दुसरा सामना जिंकून विश्वकरंडक स्पर्धेच्या ड गटातून बाद फेरी पक्की केली. विजयी घोडदौड राखताना त्यांनी ऑस्ट्रेलियाला २-० फरकाने नमविले. अगोदरच्या लढतीत पॅराग्वेचा ४-१ असा फडशा पाडलेल्या अमेरिकन संघाचे सहा गुण झाले, तर ऑस्ट्रेलियाचे तीन गुण कायम राहिले.
त्यांनी पहिल्या लढतीत तुर्किएला दोन गोलने पराभूत केले होते. पुढील फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला पॅराग्वेविरुद्ध जिंकावेच लागेल. अमेरिकेचा अखेरचा गटसाखळी सामना तुर्किएविरुद्ध होईल.
मॉरिसियो पोचेटिनो यांच्या मार्गदर्शनाखालील अमेरिकेला सामन्याच्या ११व्या मिनिटास आघाडी मिळाली. स्वयंगोलमुळे ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले. अमेरिकेच्या फोलॅरिन बॅलोगन याच्या क्रॉस पासवर कॅमेरून बर्गेस याने चेंडू स्वतःच्याच गोलनेटमध्ये मारला.
फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहानंतर ४३व्या मिनिटास ॲलेक्स फ्रीमन याने अगदी जवळून साधलेल्या हेडिंगवर अमेरिकेची आघाडी वाढली. लाईनमनने या वेळी ऑफसाइडची खूण केल्यानंतर गोल वैधतेसाठी रेफरीने व्हीएआर तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि त्यात सर्जिओ डेस्ट याच्या असिस्टवरील फ्रीमनच्या हेडिंग गोलवर शिक्कामोर्तब झाले.
पोटरीचा स्नायू दुखावल्यामुळे प्रमुख खेळाडू ख्रिस्तियन पुलिसिक याच्याविना अमेरिकेचा संघ मैदानात उतरला होता, तरीही त्यांनी विजयास गवसणी घातली. शानदार खेळ केलेला फोलॅरिन बॅलोगन सामन्याचा मानकरी ठरला.
त्याने सामन्यात पहिल्या गोलमध्ये मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर बॅलोगन याने सांगितले, की पॅराग्वेविरुद्धच्या सामन्याप्रमाणे आम्हाला झपाट्याने सुरुवात करायची होती. आम्ही तसेच केले. त्यामुळे सामना आमच्यासाठी खूपच सोपा झाला. ॲलेक्स फ्रीमनसाठी मला खूप आनंद होत आहे. तो अत्यंत नम्र व जमिनीवर पाय ठेवून वागणारा खेळाडू आहे. त्याने विश्वकरंडकातील आपला पहिला गोल नोंदविला, ही त्याच्यासाठी खास बाब आहे.
FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळलादृष्टिक्षेपात....
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ९६ वर्षांत अमेरिकेचे प्रथमच लागोपाठ दोन विजय
या वेळच्या विश्वकरंडक स्पर्धेत आता सात स्वयंगोल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांत आता अमेरिकेचे तीन विजयांसह वर्चस्व
अमेरिकेसाठी गोल केलेला ॲलेक्स फ्रीमन हा सुपर बाऊल स्टार खेळाडू अंतोनियो फ्रीमन याचा मुलगा
पहिला विश्वकरंडक गोल केलेल्या ॲलेक्स फ्रीमनचे वय २१ वर्षे आणि ३१४ दिवस