अखेर प्रतीक्षा संपणार! मान्सून पुन्हा सक्रिय; 'या' तारखेला मुंबईसह महाराष्ट्रात धुवांधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
अंकिता खाणे June 21, 2026 01:13 PM

मुंबई: जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरीही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता कडक ऊन आणि असह्य उकाड्याने होरपळून निघत आहे. परंतु, आता सर्वांसाठी एक अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, काही काळ रेंगाळलेला मान्सून आता पुढच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. २३ जूनच्या सुमारास मान्सूनचा वेग वाढणार असून, तो महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्ये वेगाने पुढे कूच करेल.(Maharashtra Monsoon Update)

Maharashtra Monsoon Update:  मान्सूनची सद्यस्थिती आणि वाटचाल

हवामान खात्याच्या माहितीनुसार, २२ ते २३ जूनपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा जोर धरताना दिसेल. सुरुवातीला पावसाची तीव्रता हळूहळू वाढेल आणि त्यानंतर २४ ते २६ जून दरम्यान मान्सून मुंबईसह उत्तर कोकण तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दाखल होईल. सध्याच्या घडीला मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुजफ्फरपूर या भागांतून जात आहे.Maharashtra Monsoon Update

Maharashtra Monsoon Update: जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात अतिवृष्टी

२५ जून ते १ जुलै या जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः २३ आणि २४ जून रोजी कोकण आणि गोव्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड असेल. मुंबईत मान्सूनचे रीतसर आगमन झाल्यानंतर, जूनच्या याच शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस हजेरी लावेल. दुसरीकडे, पूर्व मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना मुख्य मान्सूनसाठी जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, त्यापूर्वी या भागात काही ठिकाणी पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Maharashtra Monsoon Update:  विदर्भाला २५ जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा तडाखा; एल-निनोचा परिणाम

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २० जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली. तसेच, पूर्व उत्तर प्रदेश आणि विदर्भाच्या भागात येत्या २५ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. या विलंबामागे 'एल-निनो'चा प्रभाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ या एल-निनोच्या वर्षांमध्ये मुंबईत मान्सून तब्बल १४ दिवस उशिराने दाखल झाला होता. चालू वर्ष (२०२६) देखील एल-निनोचेच वर्ष असल्याने मुंबईत अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. मात्र, या एल-निनो वर्षात मुंबईकरांना येत्या २५ जून रोजी मान्सूनच्या आगमनाची सुखद बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.