बड्या शेअर्समध्ये मोठ्या कमाईची संधी! पुढील 12 महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे 9 सेन्सेक्स शेअर्स
ET Marathi June 22, 2026 10:45 AM
शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमेची असतेच परंतू योग्य शेअरमध्ये योग्य वेळी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चालू किंमत पाहण्याऐ्वजी भविष्यातील वाढीची क्षमता (Upside Potential) पाहणे फायद्याचे ठरते. बाजारातील दिग्गज विश्लेषकांचे अंदाज अनेकदा फक्त आकडेवारी नसून, बाजारात पुढील लाट कुठे येऊ शकते याचे संकेत असतात. सध्या निवडक शेअर्सच्या वाढीवर भर दिला जात असताना, सेन्सेक्समधील ९ हेवीवेट शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्यासाठी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'ट्रेंडलाइन'च्या (Trendlyne) एकत्रित विश्लेषणानुसार, तज्ज्ञांच्या सरासरी लक्ष्य किंमतीच्या आधारे या शेअर्समध्ये सध्याच्या पातळीवरून मोठी झेप घेण्याची ताकद दिसते. चला तर मग जाणून घेऊया हे ९ शेअर्स कोणते आहेत आणि त्या कंपन्यांचा नेमका व्यवसाय काय आहे.

१. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
संभाव्य वाढ (Upside): ४० टक्के
सध्याची किंमत: २,१२५ रुपये
सरासरी टारगेट प्राईस: २,९६७ रुपये

ही टाटा समूहाची मुख्य कंपनी असून आयटी (माहिती तंत्रज्ञान) सेवा, डिजिटल आणि देणारी जगातील अग्रगण्य भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. बँकिंग, रिटेल, टेलिकॉम आणि हेल्थकेअर क्षेत्रातील जागतिक कंपन्यांना सॉफ्टवेअर आणि तांत्रिक सेवा पुरवणे हा या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. या शेअरचा अभ्यास करणाऱ्या ४२ विश्लेषकांपैकी बहुतेकांनी याला 'बाय' (खरेदी) चा सल्ला दिला आहे.

२. इन्फोसिस
संभाव्य वाढ (Upside): ३८. ९५ टक्के
सध्याची किंमत: १,०५१ रुपये ४० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: १,४६१ रुपये

इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. नेक्स्ट-जनरेशन डिजिटल सेवा आणि कन्सल्टिंग क्षेत्रात या कंपनीचा मोठा दबदबा आहे. क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ही कंपनी जागतिक ग्राहकांना सेवा देते. सुमारे ४० विश्लेषकांनी या शेअरला 'बाय' रेटिंग दिले आहे.

३. महिंद्रा अँड महिंद्रा
संभाव्य वाढ (Upside): ३४. १७ टक्के
सध्याची किंमत: ३,०७४ रुपये ८० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: ४,१२६ रुपये

महिंद्रा समूहाची ही मुख्य कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. एसयूव्ही (SUV) गाड्या, कमर्शियल व्हेइकल्स आणि ट्रॅक्टर (शेतीची अवजारे) निर्मितीमध्ये कंपनी भारतात अग्रेसर आहे. याशिवाय कंपनीचा डिफेन्स, एरोस्पेस आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) निर्मितीमध्येही वेगाने विस्तार होत आहे. ३५ विश्लेषकांनी या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे.

४. एचडीएफसी बँक
संभाव्य वाढ (Upside): ३३. ३५ टक्के
सध्याची किंमत: ७७९ रुपये ८० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: १,०४० रुपये

एचडीएफसी बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. रिटेल बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, गृहकर्ज, क्रेडिट कार्ड आणि डिजिटल पेमेंट सेवांमध्ये या बँकेचा बाजारातील वाटा प्रचंड मोठा आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात बँकेचे जाळे सातत्याने विस्तारत आहे. ३९ विश्लेषकांनी या शेअरला 'स्ट्राँग बाय'चा सल्ला दिला आहे.

५. इटरनल लिमिटेड
संभाव्य वाढ (Upside): ३१. १० टक्के
सध्याची किंमत: २६४ रुपये ३० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: ३४७ रुपये

'इटरनल लिमिटेड' हे प्रसिद्ध टेक प्लॅटफॉर्म झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअरची पालक कंपनी (Parent Company) आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी, अवघ्या १० मिनिटांत घरगुती वस्तूंचा पुरवठा करणारी क्विक-कॉमर्स सेवा आणि रेस्टॉरंट्सना कच्‍चा माल पुरवणे हा या न्यू-एज टेक कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. ३२ विश्लेषकांनी या शेअरला 'बाय' रेटिंग दिले आहे.

६. रिलायन्सज इंडस्ट्रीज
संभाव्य वाढ (Upside): २९. ५७ टक्के
सध्याची किंमत: १,३०९ रुपये ५० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: १,६९७ रुपये
भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्सचा व्यवसाय तेल आणि पेट्रोकेमिकल्स (O2C) पासून ते रिटेल (रिलायन्स रिटेल) आणि टेलिकॉम (रिलायन्स जिओ) पर्यंत पसरलेला आहे. सध्या कंपनी आणि हाय-स्पीड ५जी डेटा सेवांवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करत आहे. ३२ विश्लेषकांकडून या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग मिळाले आहे.

७. आयसीआयसीआय बँक
संभाव्य वाढ (Upside): २४. ३८ टक्के
सध्याची किंमत: १,३४६ रुपये ५० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: १,६७५ रुपये

खाजगी क्षेत्रातील आणखी एक आघाडीची बँक असून, ती आपल्या भक्कम आर्थिक कामगिरीसाठी आणि डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मसाठी (iMobile) ओळखली जाते. रिटेल, कॉर्पोरेट कर्ज आणि इन्शुरन्स, म्युच्युअल फंड यांसारख्या सहाय्यक वित्तीय सेवांमध्ये कंपनीचे मोठे जाळे आहे. ३९ विश्लेषकांनी या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे.

८. बजाज फिनसर्व्ह
संभाव्य वाढ (Upside): २२. ०५ टक्के
सध्याची किंमत: १,७६९ रुपये ४० पैसे
सरासरी टारगेट प्राईस: २,१६० रुपये

ही कंपनी बजाज समूहाची वित्तीय सेवा देणारी मुख्य होल्डिंग कंपनी आहे. बजाज फायनान्सच्या माध्यमातून कंझ्युमर लेंडिंग (कर्ज पुरवठा), तसेच बजाज अलायन्झच्या माध्यमातून जनरल आणि लाईफ इन्शुरन्स (विमा क्षेत्र) व्यवसायात ही कंपनी आघाडीवर आहे. १५ विश्लेषकांनी या शेअरला 'बाय' रेटिंग दिले आहे.

९. अल्ट्राटेक सिमेंट
संभाव्य वाढ (Upside): २०. ४१ टक्के
सध्याची किंमत: ११,३६७ रुपये
सरासरी टारगेट प्राईस: १३,६८७ रुपये

आदित्य बिर्ला समूहाची ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगात आघाडीची सिमेंट उत्पादक कंपनी आहे. ग्रे सिमेंट, रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) आणि पांढरे सिमेंट निर्मितीमध्ये कंपनीचा वाटा मोठा असून, देशातील पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटच्या वाढीचा या कंपनीला थेट फायदा मिळतो. ३९ विश्लेषकांनी या शेअरला 'स्ट्राँग बाय' रेटिंग दिले आहे.

ब्रोकरेज आणि विश्लेषकांनी दिलेली टार्गेट्स ही कंपनीच्या तिमाही कामगिरी, व्यावसायिक धोरणे आणि मॅक्रो-इकॉनॉमिक स्थितीवर आधारित असतात. बाजारातील चढ-उतारानुसार यात बदल होऊ शकतो, त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यास करणे किंवा वित्तीय सल्लागाराची मदत घेणे नेहमीच हिताचे ठरते.

-

(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. )
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.