एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला
esakal June 22, 2026 10:45 AM

अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २२) होत असून पहिल्या दोन तासांतच निकाल बाहेर येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमधील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख व वंचितचे नीलेश विश्वकर्मा या निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु हर्षजित देशमुख अचानक आजारी पडले व त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गंभीर आरोप केल्याने या निवडणुकीची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात रंगली होती.

Vidhan Parishad Election : देगलुरात विधान परिषद निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान; देगलूरच्या ३१ तर मुखेडच्या २३ सदस्यांनी केले मतदान

काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींनंतर गुरुवारी (ता.१८) झालेल्या मतदानाच्या वेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तटस्थ राहून मतदान करू नये, असे आदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. परंतु ११९ पैकी केवळ २४ नगरसेवकांनी मतदान केले नाही. उर्वरित सर्वांनी मतदानाचा हक्क बजावल्याने काँग्रेसने आता पक्षाचा आदेश धुडकावणाऱ्यांवर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, एकूण ४५१ मतदारांपैकी ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सात केंद्रांवर हे मतदान झाले होते. आता सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतमोजणीला सुरवात होणार आहे. केवळ ४२७ मतांची नोंद घ्यावयाची असल्याने पहिल्या दोन तासांतच निकाल बाहेर येणार आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. कोण किती मतांनी विजयी होतो, हाच आता सर्वांच्या चर्चेचा विषय आहे.

Amravati: काँग्रेसच्या नगरसेवकांचे आदेश मोडून मतदान ; विधान परिषद निवडणूक; ४५१ पैकी ४२७ मतदारांनी बजावला हक्क एकतर्फी निवडणुकीची चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने लढत दिली नसल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याची चर्चा आहे. आता केवळ किती मतांनी विजय होतो, याकडेच साऱ्यांचे लक्ष असल्याचे बोलल्या जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.