Uddhav Thackeray News : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पाच वर्षात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही दुसऱ्यांदा फुटली आहे. सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत स्वतंत्र गट स्थापन केला. आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
2022 मध्ये पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी 2024 ला आपली ताकद दाखवत 9 खासदार मशाल चिन्हावर निवडून आणले. आता हेच खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ठाकरेंचे नेमके काय चुकले याची चर्चा सुरू आहेत. त्याचा आढावा घेऊया.
ठाकरे भेटत नाहीत...उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सर्वात मोठी तक्रार म्हणजे ते कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सहजासहजी भेटत नाहीत. ते उपलब्ध नसतात हीच सर्वात मोठी तक्रार फुटलेल्या खासदारांची आहे. विशेष म्हणजे यामध्ये तथ्य असल्याचे देखील दिसून येते. मोठ्या निवडणुकांमध्ये ठाकरे अॅक्टिव्ह होतात. प्रचार करतात मात्र निवडणुका संपल्या की फक्त 'मातोश्री'वरच असतात. त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांना देखील त्यांची सहज भेट होत नाही.
'गद्दारी'च्या नरेटिव्ह फेल2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेफुटले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी 'गद्दारी' आणि 'फितुरी' या भावनिक मुद्द्यांवर जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाचे ५७ आमदार निवडून आले, यावरून हे स्पष्ट झाले की जनतेने 'गद्दारी'च्या आरोपांना फारसे महत्त्व दिले नाही. मात्र, तरी देखील 'गद्दार' याच शब्दा भोवती शिंदेंच्या विरोधात ठाकरे राजकारण करत राहिले.
'गद्दारी' हा मुद्दा प्रभावी ठरत नाही हे विधानसभेनंतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत देखील दिसून आले. त्यामुळे फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना एक मानसिक बळ मिळाले. त्यांना खात्री पटली की, गद्दाराची शिक्का बसला तरी पुन्हा निवडून येण्यास काही अडचण येणार नाही. शिंदें आणि भाजपची ताकद सोबत असेल तर ठाकरेंना टक्कर देता येईल.
कमजोर झालेले संघटनएकनाथ शिंदे यांनी केवळ आमदार-खासदार फोडले नाहीत, तर त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद देखील आपल्यासोबत कायम ठेवली. तर, मुंबई वगळता उद्धव ठाकरेंची संघटनात्मक ताकद कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात एकनाथ शिंदेंनी आपली वाढलेली संघटनात्मक ताकद दाखवून दिली.तर, येथे ठाकरेंना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. त्यातूनच ठाकरे मुंबईच्या बाहेर फारसे लक्ष देण्यास तयार नाहीत, असा आरोप केला जात आहे.
रस्त्यावरच्या लढाईत मागे पडले...शिवसेना ही मुळात आदेशावर चालणारी संघटना होती. राजकीय पक्ष झाला तरी तिचे स्वरुप तेच राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी आदेश द्यायचा आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरायचे ही पद्धत होती. त्यामुळेच शिवसेनेचा एक प्रकारे राजकारणात धाक होता. बाळासाहेबांसारखा करिष्मा उद्धव ठाकरेंकडे नसला तरी त्यांच्याकडे संघटनेची ताकद होती. या ताकदीमधून त्यांनी शिवसैनिकांना, नेत्यांना वेगवेगळ्या सत्तास्थानांमध्ये संधी दिली. मात्र, या सगळ्यात रस्त्यावरची लढाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यातून शिवसेनेचा दरारा कमी झाला. यापूर्वी नेते फुटले तरी ते लपून बसत होते. लगेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. कारण बाळासाहेबांचा आदेश होता दिसले की ठोकून काढा, मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ती संस्कृत दिसत नाही. त्यामुळे ठोकशाहीची भाषा कळणार शिवसैनिक गोंधळल्याचे दिसून येते. त्याचा फायदा फुटलेल्यांना होता.
भावनिक नाते कमजोर...बाळासाहेबांचे शिवसैनिकांसोबत भावनिक नाते होते. त्यांच्या एका इशाऱ्यावर ते महाराष्ट्र बंद पाडत होते. बाळासाहेबांचा थेट शिवसैनिकांशी संवाद होता. मात्र, उद्धव ठाकरेंची कार्यशैली वेगळी आहे. ते नेत्यांवर विसंबून राहत असल्याचे दिसून येते. एकदा एका विभागाची जबाबदारी नेत्यावर टाकली तर त्यानेच तेथील सर्व प्रश्न पाहायचे असे काहीसे स्वरुप आता शिवसेनेत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पक्ष संघटना एकनाथ शिदेंकडे सुपूर्द केल्या सारखी परिस्थिती होती. त्यामुळे सामान्य शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यात असलेले भावनिक नाते कमजोर झाले आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाची भाषा बोलतात मात्र ते महाविकास आघाडीसोबत आहेत.त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वावर विरोधकांकडून शंका घेतली जात आहे. आपले हिंदुत्व हे जानवे आणि शेंडीचे नसल्याचे ते सांगतात. मात्र, आपले विचार आपल्या संघटनेतील लोकांमध्ये झिरपले पाहिजेत यासाठी वेगळी व्यवस्था दिसून येत नाही. नवीन राजकीय भूमिकेत कुचंबना होणाऱ्या कार्यकर्त्यांना वैचारिक स्पष्टता देण्यात येत नसल्याचे अनेक शिवसैनिक, नेते, आमदार-खासदारांना शिंदेंची भूमिका जवळची वाटते.