वरसोली येथे करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियान
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आगरी समाज संस्थेचे पाऊल
अलिबाग, ता. २२ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, शिक्षणातील विविध संधींची माहिती व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी व्हावी, या उद्देशाने अलिबागच्या आगरी समाज संस्था यांच्या वतीने करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाची सुरुवात वरसोलीच्या आयईएस शाळा येथे करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटपदेखील करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी छंद आणि करिअर यांमधील महत्त्वाचा फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा योग्य मेळ घालून करिअरची निवड करावी, असे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानामागील सामाजिक उद्देशही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन भविष्यात विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणारी आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
या वेळी आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल तांबडकर, मार्गदर्शक अनंत म्हात्रे, उदय म्हात्रे, तुषार थळे, मनोहर पाटील व युवा कार्यकर्ते श्रेयस ठाकूर उपस्थित होते.
.........
फोटो ओळी : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगरी समाज संस्थेच्या वतीने आयईएस शाळेत करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला